• Wed. Oct 15th, 2025

थकीत देयकांसाठी व्हिडिओकॉन कंपनीतील कामगारांचा ठिय्या

ByMirror

Feb 9, 2025

न्यायालयाच्या निकालानंतरही देयके मिळत नसल्याने कामगारांमध्ये संतप्त भावना

सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा

नगर (प्रतिनिधी)- बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथील व्हिडिओकॉन (सध्याची फोर्स अप्लायन्स) कंपनीतील कामगारांनी मार्च 2018 पासूनची थकीत पगाराची देयके मिळावी म्हणून नगर जिल्हा मजदूर सेनेच्या वतीने कंपनी समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. न्यायालयाचा निकाल लागूनही पगार न मिळाल्याने कामगारांमध्ये संतप्त भावना आहेत. जोपर्यंत थकीत देयके मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही, असा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे. याशिवाय, देयके न मिळाल्यास सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे.


नगर जिल्हा मजदूर सेनेच्या माध्यमातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबुशेठ टायरवाले यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात विद्या पवार, आप्पासाहेब पाटील, मीना रोकडे, बिजली लांडे, सुनिता क्षीरसागर, रवींद्र कुदळे, पाराजी पानसंबळ, अनिल गादिया, लक्ष्मण लोखंडे, नितीन गांधी यांच्यासह अनेक कामगार सहभागी झाले आहेत. रविवारी (दि.9 फेब्रुवारी) या आंदोलनाचा दुसरा दिवस होता.


व्हिडिओकॉन कंपनीतील 150 ते 200 कामगारांना मार्च 2018 पासून पगार मिळालेले नाहीत. कंपनी कडून कामगारांना 3.5 कोटी रुपयांची देयके देणे बाकी आहे. यामधील 30 कामगारांनी न्यायालयात दावा दाखल केला होता. न्यायालयाने 2023 मध्ये निकाल देऊन, कंपनीला सर्व कामगारांची थकीत देयके देण्याचे आदेश दिले होते. तथापि, आजतागायत कामगारांना त्यांचे देयके मिळालेली नाहीत. कंपनीच्या जागेवर एका बँकेने ताबा घेतला असून, ती मालमत्ता विक्री केली आहे. परंतु, विक्रीनंतर देखील कामगारांचे देयके अद्याप दिलेले नाहीत, यामुळे कामगारांत मोठा रोष पसरला आहे.


बाबुशेठ टायरवाले यांनी सांगितले की, बँकेला न्यायालयाच्या आदेशानुसार कामगारांची थकलेली देयके मालमत्ता विक्री पश्‍चात देणे बंधनकारक आहे. परंतु, बँकेने परस्पर जागा विकून कामगारांवर अन्याय केला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी हा लढा तीव्र केला जाईल, असे त्यांनी ठामपणे भूमिका स्पष्ट केली.


कंपनीतील महिला कामगार मीना रोकडे यांनी सांगितले की, मार्च 2018 पासून वेतन दिलेले नाही, त्यामुळे सर्व कामगारांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील देयके मिळत नसल्यास, हे कामगारांसाठी एक मोठी शोकांतिका आहे. कामगारांचा जीवन जगणे-मरण्याचा प्रश्‍न निर्माण झाला असल्याचे स्पष्ट केले. न्याय, हक्कासाठी संघर्षमय लढाई अजूनही चालू आहे, आणि यासाठी आक्रमक भूमिकेच्या तयारीत असल्याची भावना कामागरांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *