स्पर्धेत मुलींच्या संघाचे उत्कृष्ट प्रदर्शन
नगर (प्रतिनिधी)- राज्यस्तरीय शालेय टेनिस क्रिकेट स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या (राहुरी कृषी विद्यापीठ) मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकाविले. क्रीडा व युवक संचालनालय पुणे (महाराष्ट्र राज्य) व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे यांच्या वतीने राज्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत पुणे विभागातील अहिल्यानगर जिल्ह्यातील सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय राहुरी कृषी विद्यापीठ या संघाने उत्कृष्ट कामगिरी करून आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करुन उपविजेतेपद पटकाविले. संघातील खेळाडूंचा विद्यालयाचे प्राचार्य अरुण तुपविहीरे, उपप्राचार्य बाळासाहेब डोंगरे व पर्यवेक्षक मनोज बावा यांनी सत्कार करुन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
नाशिक विभागाचा पराभव करून सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या अहिल्यानगर संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती. अमरावती संघाबरोबर झालेल्या अंतिम सामन्यात पराभव पत्कारावा लागला. हा संघ पुणे विभागातून सोलापूर, पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड या संघाचा पराभव करून राज्य स्पर्धेसाठी पात्र ठरला होता.
सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या अहिल्यानगर संघात सिमरन शेख (कर्णधार), वृषाली पारधे, ऐश्वर्या चौरसिया, संतोषी भिसे, मृणाल ननवरे, धनश्री पवार, नशरा सय्यद, धनश्री शेडगे, तनिष्का मगर, राशी पवार, प्रणाली पानसंबळ या खेळाडूंचा समावेश होता. सदर खेळाडूंना क्रीडा शिक्षक घन:श्याम सानप, संतोष जाधव सर यांचे मार्गदर्शन लाभले.
विजेच्या संघाचे सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाचे सचिव महानंदजी माने, सभापती प्रमोद रसाळ, खजिनदार महेश घाडगे आदींसह सर्व शालेय शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.
राज्य शालेय टेनिस क्रिकेट मध्ये उपविजेता ठरलेला सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाच्या संघातील खेळाडूंचा शाळेत सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य अरुण तुपविहीरे, उपप्राचार्य बाळासाहेब डोंगरे, पर्यवेक्षक मनोज बावा, क्रीडा शिक्षक घन:श्याम सानप, संतोष जाधव आदी.