महिलांचा सन्मान व प्रबोधन कार्यकम, रमाई च्या योगदानाची आठवण
तथागत बुध्दिस्ट सोसायटी व नमो बुद्धाय महिला ग्रुपचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- तथागत बुध्दिस्ट सोसायटी (इंडिया) व नमो बुद्धाय महिला ग्रुपच्या वतीने दरेवाडी (ता. नगर) येथे त्यागमुर्ती रमाई आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील बुद्ध विहारात विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. महिलांना साड्यांचे वितरण करून त्यांचा सन्मान करण्यात आला. महिलांसाठी त्यागाची, संघर्षाची आणि शौर्याची प्रेरणा असलेल्या रमाई आंबेडकर यांच्या योगदानाचा आदर्श ठेवून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
प्रारंभी रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी दरेवाडी गावचे सरपंच अनिल करांडे, ग्रामपंचायत सदस्य अक्षय भिंगारदिवे, तथागत बुध्दिस्ट सोसायटीचे अध्यक्ष संजय कांबळे, महिला अध्यक्षा आरतीताई बडेकर, सुरेश भिंगारदिवे, विजुभाऊ भिंगारदिवे, यशवंत पाटोळे आदींसह ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
जयंतीच्या निमित्ताने, संजय कांबळे यांनी त्यागमुर्ती रमाई आंबेडकर यांचे जीवनपट आपल्या भाषणातून उलगडले. ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि रमाई यांना एकूण पाच मुलं झाली, पण समाजासाठी चार मुलांचे त्यांनी बलिदान दिले. बाबासाहेब समाजासाठी संघर्ष करत असताना गंगाधर, रमेश, इंदु आणि राजरत्न हे सर्व मुले उपचारा अभावी मरण पावली. तरी देखील त्या खचल्या नाहीत, बाबासाहेबांच्या संघर्षात त्या खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी या आठवणी महिलांना सांगितल्या. तर रमाई आंबेडकर यांच्या जीवनातील त्याग व संघर्षाची महती सांगितली.
महिला अध्यक्षा आरतीताई बडेकर यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनात रमाई आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यांनी महिलांना प्रबोधन करताना सांगितले की, आपल्या जीवनात ज्या महिला समोर बसलेल्या आहेत, त्यांच्यात मला रमाईचं चित्र दिसतं. त्या अत्यंत कठीण परिस्थितीत राहून समाजासाठी त्याग करत होत्या.
गौतमी भिंगारदिवे, तृप्तीताई कांबळे, अनिताताई आंग्रे, संप्रिता पंडित, मिराताई देठे, अंकाशा भिंगारदिवे, कांचन भिंगारदिवे, अनिता कांबळे, प्रतिमा भिंगारदिवे, सारिका भिंगारदिवे, वंदना पातारे, पुनम भिंगारदिवे, नंदा जगताप, पंचशिला गंगावणे, सिमा भिंगारदिवे, मंदा बारे, मिरा घोडके, दिपाली साळवे, कौसाबाई भिंगारदिवे, परिगा अवचरे, शांताबाई साळवे, शोभा भिंगारदिवे, जयश्री भिंगारदिवे, रंजना भिंगारदिवे, द्रोपदाबाई शिंदे, शोभा शिंदे, उषा शिंदे, बेबी लोंखडे, पारुबाई लोंखडे, मिरा लोंखडे, मिरा नन्नवरे, सुनिता भिंगारदिवे, मिरा भिंगारदिवे, किरण गायकवाड, रोहिणी गायकवाड, प्रमिला शिंदे, जयश्री शिंदे, पुष्पा भिंगारदिवे, लंकाताई कांबळे या महिलांचा साडी देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी, संजय कांबळे यांनी डॉ. बाबासाहेब आणि रमाई यांच्या योगदानावर आधारित स्वतः लिहिलेलं गाणं सादर केले. कार्यक्रमाला आसपासच्या गावांतील उपासक, उपासिका, बालवर्ग आणि महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. या कार्यक्रमात रमाई आंबेडकर यांच्या योगदानाची आठवणी ताज्या केल्या. तर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी कार्यक्रमाला रंगत वाढवली.