रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची (गवई) मागणी
रिक्षा स्टॉपमुळे वाहतूकीस अडथळा, महिलांची छेडछाड व लहान-मोठे अपघात घडत असल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- शहरातील तारकपूर बस स्टॅन्ड मधील अनाधिकृत रिक्षा स्टॉप हटविण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आली आहे. बस स्थानकाच्या आतमध्ये असलेल्या रिक्षा स्टॉपमुळे वाहतूकीस अडथळा, महिलांची छेडछाड व लहान-मोठे अपघात घडत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सदर रिक्षा स्टॉप बस स्थानकाच्या आवारातून बाहेर हलविण्याच्या मागणीचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. याप्रसंगी ओबीसी सेलचे उपाध्यक्ष विल्सन रुकडीकर, शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, बबलू मकासरे, निखिल मगर, शुभम रोकडे, जमीर सय्यद, जफर काझी, रईस शेख, दिलनवाज शेख आदी उपस्थित होते.
तारकपूर बस स्टॅन्डच्या आवारात एसटी महामंडळाच्या जागेत अनेक वर्षापासून बेकायदेशीररित्या रिक्षा स्टॉप सुरू आहे. सदर रिक्षा स्टॉपवर 15 ते 20 रिक्षा थांबत असल्याने महामंडळाच्या बसेस यांना आत जाण्यास अथवा बाहेर पडण्यास मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रिक्षा चालक प्रवासी वाहतुक करताना येणाऱ्या व जाणाऱ्या बसचा विचार करत नाही; त्यामुळे अडचण निर्माण होत आहे. सदर रिक्षा स्टॉपमुळे सदर भागात लहान-मोठे अपघात घडत आहे. महामंडळाचे कर्मचारी देखील त्यांना वैतागले आहेत. परंतु काही रिक्षाचाल गुंड प्रवृत्तीचे असल्याने त्यांच्याशी वाद कोणीही घालत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नियमाप्रमाणे रिक्षा स्टॉप हे कोणत्याही बस स्टॅण्डच्या आत मध्ये नसते, परंतु तारकपूर एकमेव बस स्टॅण्ड असून, ज्याच्या आवारातच रिक्षा स्टॉप आहे. नेमके हे रिक्षा स्टॉप कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे? याचा शोध घेणे देखील गरजेचे आहे. सदर रिक्षा चालक वाटेल ते भाडे आकारात आहे. रिक्षा स्टॉप मधील काही रिक्षा चालक हे मद्य पाषाण करणारे आहेत. त्यांच्याकडून अनेकदा महिलांची छेडछाड झाली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. येथील रिक्षाचालकांच्या दहशतीमुळे तक्रार देण्यास कोणी पुढे येत नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे. शहरातील तारकपूर बस स्टॅन्ड मधील अनाधिकृत रिक्षा स्टॉप हटविण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) च्या वतीने करण्यात आली आहे.