पारनेर पंचायत समिती अंतर्गत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राची चौकशी करण्याची मागणी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीचा शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा
नगर (प्रतिनिधी)- दोन पेक्षा अधिक अपत्य असताना देखील पारनेर तालुक्यातील शिक्षण विभाग पंचायत समिती अंतर्गत नागरी सेवा (लहान कुटुंब) प्रतिज्ञापत्र नियम 2005 अन्वये नमुना अ नियम 4 नुसार खोटी माहिती देणाऱ्या शिक्षक व मुख्याध्यापकांच्या प्रतिज्ञापत्राची चौकशी करुन दोषींना बडतर्फ करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला दिले असून, यासंबंधी कारवाई न झाल्यास पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
पारनेर तालुक्यातील शिक्षण विभाग पंचायत समिती अंतर्गत असलेल्या काही शिक्षक व मुख्यध्यापकांना दोन पेक्षा अधिक अपत्य असताना देखील प्रतिज्ञापत्राद्वारे खोटी माहिती दिलेली आहे. यासंदर्भात नागरी सेवा (लहान कुटुंब) प्रतिज्ञापत्र नियम 2005 अन्वये नमुना अ नियम 4 प्रमाणे प्राथमिक जिल्हा शिक्षण विभाग यांच्या स्तरावरून समिती नेमून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञा पत्राची चौकशी करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.
नागरी सेवा (लहान कुटुंब) प्रतिज्ञापत्र नियम 2005 अन्वये खोटी सादर करणाऱ्या व दोन पेक्षा अधिक अपत्य असलेल्या शिक्षक, मुख्याध्यापक यांना शासन परिपत्रकानुसार तात्काळ बडतर्फ करण्याचे आदेश देण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. तर या प्रकरणात शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संबंधीतांवर गुन्हे दाखल करुन त्यांनी घेतलेले वेतन वसुल करण्याचे म्हंटले आहे.