शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी घेतली खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट
केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी
नगर (प्रतिनिधी)- शहरातील लष्करी हद्दी जवळ व ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात नवीन घर बांधण्यासाठी व दुरुस्तीसाठी येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन जाधव यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कडे केली.
नुकतेच दिल्ली येथे जाधव यांनी खासदार शिंदे यांची भेट घेऊन सदर प्रश्नांबाबत लक्ष वेधले. पुरातत्त्व विभागाच्या तरतुदी अंतर्गत ऐतिहासिक वास्तूच्या 100 ते 300 मीटर पर्यंत नवीन बांधकाम करता येत नाही. तर जुने बांधकामाच्या दुरुस्तीसाठी देखील परवानगीला अनेक अडचणी येत आहे. मर्यादीत उंची पर्यंत बांधकाम करण्याचे आदेश आहेत. तसेच लष्करी हद्दीतही घरांच्या बांधकामाबाबत परवानगीला अनेक अडचणी येत आहे. तसेच लष्करी हद्दी जवळील 100 ते 500 मीटर पर्यंत घरांच्या बांधकामांना परवानगी नाकारली जात आहे. या जाचक नियमांमुळे स्वत:च्या मालकीची असलेली जागा सोडून नागरिकांना दूर ठिकाणी जावे लागत आहे.
ऐतिहासिक शहरात अनेक ठिकाणी विविध ऐतिहासिक वास्तू आहे. तर नगर शहर लष्करी हद्दीने व्यापले आहे. यामुळे शहराचा विकास होण्यास मर्यादा निर्माण होत आहे. नागरिकांना परवानगी घेऊन बांधकाम करण्याची इच्छा असताना देखील परवानगी मिळत नसल्याने विनापरवाना बांधकाम करण्याची वेळ येत आहे. यामुळे शासनाचा देखील मोठ्या प्रमाणात महसुल बुडत असून, नागरिकांना अनेक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले.
शहरीकरण झपाट्याने वाढत असताना शहरातील लष्करी हद्दी जवळ व ऐतिहासिक वास्तूंच्या परिसरात बांधकामाची परवानगी देताना अंतराची मर्यादा 10 मीटर पर्यंत आणण्याची मागणी करण्यात आली असून, यासाठी केंद्र शासनस्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी जाधव यांनी खासदार शिंदे यांच्याकडे केली आहे. तसेच जाधव यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करुन अभिष्टचिंतन केले.