भविष्यातील करियरच्या दृष्टीने मार्गदर्शन
विद्यार्थ्यांनी आपल्या मधील क्षमता ओळखून त्या दिशेने वाटचाल करावी -रेहान काझी
नगर (प्रतिनिधी)- नागोरी मुस्लिम मिसगर जमाअत ट्रस्ट संचालित मिसगर ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्सच्या बारावी मधील विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला. बारावी बोर्डाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा देवून त्यांना भविष्यातील करियरच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले.
निरोप समारंभाच्या कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठन व प्रार्थना गीताने झाली. संस्थेचे ज. सेक्रेटरी रेहान काझी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार सुभाष चिंधे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सुभाष चिंधे यांनी कोणत्याही शाखेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना आपले भविष्य घडवता येते. मात्र त्यासाठी आपले ध्येय स्पष्ट असले पाहिजे. ज्या ध्येयाने व दिशेने वाटचाल करायची आहे, ते ध्येय विद्यार्थ्यांनी निश्चित करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश कसे प्राप्त करावे? याबद्दल मार्गदर्शन करुन, विद्यार्थ्यांना भावी वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.
रेहान काझी म्हणाले की, बारावी बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांचे पुढील भवितव्य निश्चित करत असते. विद्यार्थ्यांनी आपल्या मधील क्षमता ओळखून त्या दिशेने वाटचाल केल्यास यश मिळणार असल्याचे स्पष्ट करुन, अभ्यासाचे महत्त्व व आयुष्य जगण्याचे मूल्य विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
यावेळी अहमदनगर उर्दू प्रायमरीच्या मुख्याध्यापिका रुमाना खान, ऐम इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका नाजनीन शेख उपस्थित होत्या. संस्थेच्या वतीने इनामुल्लाह खान, वाजिद खान व इफ्तेखार खान यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॉलेजचे प्राध्यापक अझहर खान, प्रा. रियाझ सर, प्राध्यापक फिरदौस खान, प्रा. मतीन पटेल, प्रा. नादिर पठाण, प्रा. यास्मिन बाजी, प्रा. अफ्फान तांबटकर, मुनव्वर खान यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. फिरदौस खान यांनी केले. आभार प्रा. अफ्फान तांबटकर यांनी मानले.