महिला सक्षमीकरणाने विकास; तर मुलांवर संस्कार रुजविल्यास समाज घडणार -अनिता काळे
नगर (प्रतिनिधी)- भिस्तबाग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माता पालक मेळाव्यात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात पार पडले. या हळदी-कुंकू कार्यक्रमात महिला सक्षमीकरणाचा जागर करुन मुलांवर संस्कार घडविण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी महिलांसाठी विविध स्पर्धा पार पडल्या.
जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या हळदी-कुंकूच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका शारदाताई ढवण, सहशिक्षिका शितल आवारे, सुरेखा वाघ, रोहिणी ससे, माधुरी चोथे, अनुजा घुले, अमृता वाघमारे, व्यवस्थापन समिती अध्यक्षा सरला ढवण, संगीता कजबे, ज्योती लाटे, अहिल्या सांगळे, योगिता वाघमारे, सविता काजळकर आदींसह माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अनिता काळे म्हणाल्या की, महिला सक्षम झाल्यास समाजाचा विकास साधला जाणार आहे. तर मुलांवर संस्कार रुजविल्यास समाज घडणार आहे. मुलांना घडविताना शिक्षणाबरोबर संस्कार महत्त्वाचे आहेत. सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांचा वारसा चालविताना त्यांचा आदर्श समोर ठेऊन वाटचाल करण्याची गरज आहे. महिलांनी उंबरठा ओलांडून स्वत:चे कर्तृत्व सिध्द करण्याचे त्यांनी आवाहन केले.
या कार्यक्रमात महिलांचे उखाना स्पर्धा, संगित खुर्ची आदींसह विविध मनोरंजनात्मक स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या आईच्या विविध स्पर्धा पाहण्याचा आनंद लुटला. विजेत्या महिलांना बक्षीस देण्यात आले. यावेळी उपस्थित महिलांनी एकमेकींना हळदी-कुंकू लावून वाण दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितल आवारे यांनी केले. आभार सुरेखा वाघ यांनी मानले.