सांस्कृतिक कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे उलगडले जीवनपट
विद्यार्थ्यांना जीवनाची दिशा समजली, तर आयुष्याची दशा बदलेल -अशोक कडूस (शिक्षणाधिकारी)
नगर (प्रतिनिधी)- सारसनगर येथील कै. दामोधर विधाते (मास्तर) प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडविले. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक क्रांती घडविणारे जीवनपट विद्यार्थ्यांनी उलगडले. नृत्याविष्कारातून सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देऊन, शेतकरी आत्महत्येचा ज्वलंत प्रश्न मांडला. विविध हिंदी-मराठी गाण्यावर रंगलेल्या नृत्याने सांस्कृतिक कार्यक्रमात रंग भरला होता.
सरस्वती पूजन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. लेझीम व बॅण्ड पथकाच्या निनादात पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. जि.प. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, शालेय संस्थेचे विश्वस्त बाळासाहेब विधाते, सरचिटणीस प्रा. शिवाजी विधाते, रामदास कानडे, मयूर विधाते, पद्मशाली प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम, मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के, संतोष सुसे आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविकात लता म्हस्के यांनी शाळेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. मुख्याध्यापक शिवाजी म्हस्के यांनी वार्षिक अहवाल सादर करून शाळेचा वाढता गुणवत्तेचा आलेख मांडला. पाहुण्यांचे परिचय भाऊसाहेब पुंड व सचिन बर्डे यांनी करून दिला. शाळेच्या ज्ञानसागर या चौदाव्या वार्षिक अंकाचे प्रकाशन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तर कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. लवकरच सेवानिवृत्त होत असलेले मार्कंडेय शाळेचे शिक्षक प्रा. शिवाजी विधाते यांचा बाळकृष्ण सिद्दम यांनी सत्कार करुन संस्थेसाठी त्यांचे नेहमीच सहकार्य मिळाले असल्याची भावना व्यक्त केली.
शिक्षणाधिकारी अशोक कडूस म्हणाले की, शैक्षणिक प्रवाह बदलत आहे. नवीन शैक्षणिक धोरण स्विकारुन पुढे जाण्याची गरज आहे. शालेय जीवनात पास-नापास व कमी गुण महत्त्वाचे नसून, विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमतेने स्वत:ला सिध्द करावे. शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी वेळेचे महत्त्व समजून घ्यावे. पारंपारिक शिक्षणापेक्षा जिवंत शिक्षण महत्त्वाचे ठरणार आहे. कौशल्य आत्मसात करुन स्पर्धेत उतरा. विद्यार्थ्यांना जीवनाची दिशा समजली, तर आयुष्याची दशा बदलेल, असे त्यांनी सांगितले.
माजी उपमहापौर गणेश भोसले यांनी प्रभागातील विविध प्रश्न सोडवून शाळेच्या प्रवेशद्वार पर्यंत काँक्रिटीकरणाचे रस्ते निर्माण करुन देण्यात आले आहे. तर शाळे जवळच स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभे राहत असून, याचा खेळाडूंना लाभ होणार आहे. तसेच या प्रभागात म्युझिकल फाउंटन व मनपाचे अद्यावत हॉस्पिटल आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून साकारण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेश वंदनाने सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोळी नृत्य व पोतराज नृत्यासह जागरण गोंधळाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. तांडव नृत्याच्या बहारदार सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली, लगीन देवाच या नृत्य विष्कारातून खंडेरायाच्या विवाहाचा सोहळा घडविण्यात आला. आंम्ही शिवकन्या या गीतांमधून स्त्री शक्तीचे दर्शन घडविण्यात आले. अकेले हम, अकेले तुम…, माय भवानी…, बानू बानू…, कान्हा सोजा जरा… आदी गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रम रंगले होते. विविध गीतांवर रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित पालक, विद्यार्थी व शिक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कला गुणांना दाद दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल मेहत्रे, सारिका गायकवाड व निता जावळे यांनी केले. आभार सविता सोनवणे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राधाकिसन क्षीरसागर, योगेश दरवडे, मिनाक्षी घोलप, श्रृती पेंटा आदींनी परिश्रम घेतले.