तात्काळ निवासी वैद्यकीय अधिकारीची नेमणुक करण्याची मागणी
जनकल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- टाकळी काझी परिसरातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात तात्काळ निवासी वैद्यकीय अधिकारीची नेमणुक करण्याची मागणी जनकल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. संस्थेच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी बापूसाहेब नागरगोजे यांची भेट घेऊन सदर मागणीचे निवेदन दिले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष विनोद साळवे, सचिव नितीन गोर्डे, श्रीधर शेलार, रोहन शिंदे, मालनताई जाधव, माजी उपसरपंच शिवाजीराव बेरड, तनीज शेख, पोपटराव दोंदे, ह.भ.प. राजेंद्र पाटोळे, बाळासाहेब दोंदे, ॲड. महेश शिंदे आदी उपस्थित होते. तर सदर प्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
टाकळी काझी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनेक दिवसापासून निवासी वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सुविधा मिळत नसल्याने पर्यायाने रुग्णांना उपचारासाठी शहरातील जिल्हा रुग्णालय येथे धाव घ्यावी लागत आहे. प्रसुतीच्या सुट्टीवर असलेल्या औषध निर्माण अधिकारी व वैद्यकीय अधिकारी वर्ग दोन यांच्यामुळे स्थानिक नागरिकांचा आरोग्यासंदर्भात खोळंबा झाला असल्याचे संस्थेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य विभागाने सदर प्रश्नाची गांभीर्याने दखल घेऊन टाकळी काझी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर निवासी वैद्यकीय अधिकारी यांची नेमणुक करण्याची मागणी ग्रामस्थांच्या वतीने जनकल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने केली आहे.