ग्रामसेवक, तलाठी व गटविकास अधिकारी यांच्यावर देशद्रोहासह ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
नगर (प्रतिनिधी)- दरेवाडी (ता. नगर) येथील खासगी जागेवर रमाई आवास योजनेचा प्रकल्प राबवून भ्रष्टाचार केलेल्यांवर देशद्रोहाचा व ॲट्रोसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई) वतीने करण्यात आली आहे. याप्रकरणी रिपाईच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन दिले. याप्रसंगी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, सुशांत म्हस्के, गुलाम शेख, विल्सन रुकडीकर, आझीम खान, शाहबाज शेख, जमीर सय्यद आदी उपस्थित होते.
दरेवाडी गावात संतोष भाऊसाहेब भिंगारदिवे यांची जमीन आहे. त्या जमिनीतील गट नंबर 155 प्लॉट 30 अ, 155/ 46,155/47 मध्ये असून ते त्यांचे कायदेशीर मालक आहेत. परंतु त्या गावातील ग्रामसेवक, तलाठी, गटविकास अधिकारी यांनी सन 2017-18 मध्ये संगणमत करुन अनुसूचित जातीतील लाभधारकांना घरकुल मंजूर करून जागेची शहानिशा न करता भिंगारदिवे यांच्या जागेवर घरकुल बांधले आहेत. या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक झाली असल्याचा आरोप रिपाईच्या वतीने करण्यात आला आहे.
सदर जागेवर रमाई आवास योजनेतील घरकुलांचे बांधकाम पूर्ण करून पूर्णत्वाचा खोटा दाखलाही देण्यात आला आहे.घरकुलांची संपूर्ण रक्कम वर्ग केली आहे. या सर्व व्यवहारात मूळ जागा मालकाला काही कल्पना न देता आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन भिंगारदिवे यांच्या जागेत अनाधिकृत घरकुल उभारण्यात आलेले आहे. सदर प्रकरण गंभीर असून, यामधील दोषी ग्रामसेवक, तलाठी व गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.