पूर्वीच्या ओटे धारक भाजी विक्रेते व गाळेधारकांना त्यांच्या हक्काची जागा मिळवून देण्याची मागणी
मुंबईत बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याचे शिंदे यांचे आश्वासन
नगर (प्रतिनिधी)- महापालिका प्रशासनाने शहरातील नेहरु मार्केटच्या जागेवर भाजी मंडईसह तीन मजली व्यापारी संकुल बांधण्याच्या आराखडा तयार केलेले असताना यामध्ये पूर्वीच्या ओटे धारक भाजी विक्रेते व गाळेधारकांना त्यांच्या हक्काची जागा मिळवून देण्याची मागणी विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यासंदर्भात हातगाडी भाजी विक्रेते संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय झिंजे व भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप (भैय्या परदेशी) यांनी प्रा. शिंदे शहरात आले असताना त्यांची भेट घेऊन सदर प्रश्नांवर चर्चा केली.
सभापती प्रा. राम शिंदे यांनी नेहरु मार्केट संदर्भात पूर्ण माहिती घेऊन, या प्रश्नामध्ये स्वत: लक्ष घालून या संदर्भात आयुक्तांच्या उपस्थितीमध्ये मुंबईला बैठक बोलावून हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. तर मनपा आयुक्त पूर्वीच्या ओटे धारक भाजी विक्रेते व गाळेधारकांना त्यांच्या हक्काची जागा देण्यासंदर्भात मानसिकता दिसत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शहरातील चितळे रोड येथे व्यापारी संकुल बांधण्याच्या उद्देशाने नेहरु मार्केटची इमारत 14 वर्षांपूर्वी पाडण्यात आली. यामध्ये 72 ओटे धारक भाजी विक्रेते व 15 गाळेधारकांचा समावेश होता. हे गाळे पाडले जात असताना महापालिकेने औरंगाबाद हायकोर्टाच्या खंडपिठात एका वर्षामध्ये भव्य व्यापारी संकुल बांधत आहोत व त्या व्यापारी संकुलात तळमजल्यावर ज्यांचे ओटे व गाळे पाडण्यात आले, त्यांना जागा प्राधान्याने देण्याचे शपथपत्र दिले होते. मात्र 14 वर्षे होऊन गेले तरी, नवीन वास्तू बांधण्याचा महापालिकेने कोणताही प्रयत्न केलेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
15 दिवसांपूर्वी महापालिकेने स्वतःच्या खर्चाने तीन मजली संकुल बांधत असल्याचे जाहीर केले आहे. मात्र यामध्ये पूर्वीचे ओटे धारक व गाळेधारकांची जागे कोठे आहे? याबाबत खुलासा केलेला नाही. यासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी सदर जागेची पहाणी करुन आयुक्तांसह बैठक घेतली होती. या बैठकीतही आयुक्तांनी सदर गाळ्यांचा लिलाव होणार असल्याचे सांगितले. मात्र त्यांनी पूर्वीचे ओटे धारक व गाळेधारकांच्या जागेच्या प्रश्नावर समाधानकारक उत्तर दिलेले नसल्याचे म्हंटले आहे.
नेहरु मार्केटच्या जागेवर भाजी मंडईसह तीन मजली व्यापारी संकुल बांधले जात असताना पूर्वीचे गोरगरीब ओटे धारक भाजी विक्रेते व गाळेधारकांना त्यांच्या हक्काची जागा मिळण्याची मागणी हातगाडी भाजी विक्रेते संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय झिंजे व भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप (भैय्या परदेशी) यांनी केली आहे.