रिपाई महिला आघाडीचे पाच दिवसापासून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया उपोषण सुरु
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या बदलीची मागणी
नगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध धंदे बंद करावे, सदर हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यास व अवैध धंदे बंद करण्यास अकार्यक्षम ठरल्याचा आरोप करत एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या बदलीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई) महिला आघाडीच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण सुरु करण्यात आलेले आहे. सदर उपोषणाचा शनिवारी (दि.1 फेब्रुवारी) पाचवा दिवस होता.
या उपोषणात रिपाई महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती पवार, रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, कावेरी भिंगारदिवे, ज्योती साठे, जयश्री गायकवाड, शितल नाटेकर, सारिका गांगुर्डे, सविता भालेराव, सारिका साळवे, संपदा म्हस्के, दानिश शेख, नईम शेख, संदीप वाघचौरे, विजय शिरसाठ, गुलाम शेख, जमीर सय्यद, जावेद सय्यद, अजीम खान, देवेंद्र वाघमारे, शहाबाज शेख, प्रतीक शिंदे, मुन्ना भिंगारदिवे, विल्सन रूकडीकर, प्रवीण भिंगारदिवे, अकिल शेख, राहुल गाडेकर, दिलनवाज शेख, योधन भालेराव आदींसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये गांजा, हातभट्टी, मटका, जुगार, बिंगोसह गुन्हेगारी जोमाने सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक झोपेचे सोंग घेत असून, या भागात अवैध धंद्याबरोबरच गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. दरोडा, लूटमार, चोऱ्या यांसारखे गंभीर गुन्हे सातत्याने घडत आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या पांढरीपुल नीलकमल हॉटेलच्या मागे सर्व प्रकारचा गुटखा खुलेआम विक्री सुरू होती. सदर गुटख्याच्या धंद्यावर नाशिक येथील डीआयजी यांच्या पथकाने कारवाई केली असता, त्या ठिकाणी सुमारे 1 कोटी रुपयांचा गुटखा ताब्यात घेण्यात आला. तरी देखील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.
सध्या परिस्थितीमध्ये सर्वात जास्त गांजाची विक्री एमआयडीसी हद्दीत होताना दिसून येत आहे. अनेक युवक गांजाच्या नशेला बळी पडत असून, नशेमध्ये बेभान होऊन त्यांच्याकडून अनेक गंभीर गुन्हे घडत आहे. यामध्ये अनेक अल्पवयीन मुले असून, त्यांचे भवितव्य उध्वस्त होत आहे. हातभट्टी पिऊन अनेक युवक मृत्युमुखी पडले आहेत. व्यसनाच्या आहारी गेलेल्यांचे संसार उध्वस्त झाले आहेत. सोरट, बिंगो, जुगार, मटका या अवैध धंद्यावर रोजंदारीवर कमवलेले पैसे युवक गमावत आहे. त्यामुळे अनेक कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असून, काही कुटुंबीय कर्जबाजारी झाले असल्याचे म्हंटले आहे.
या अवैध धंद्यावर पोलीस प्रशासनाकडे मागणी करून देखील कारवाई केली जात नाही. अवैध धंदेवाले देखील बिनधास्तपणे पोलिसांना हप्ते चालू असल्याचे उघडपणे बोलत आहे. एक प्रकारे अवैध धंद्यांना पाठबळ देण्याचे काम होत असल्याचा आरोप रिपाई महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.