विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन
जय युवा अकॅडमी व डॉ.आंबेडकर फाउंडेशनचा उपक्रम
नगर (प्रतिनिधी)- जय युवा अकॅडमी व सामाजिक न्याय मंत्रालय अंतर्गत डॉ. आंबेडकर फाउंडेशन (नवी दिल्ली) च्या संयुक्त विद्यमाने कोहिनूर मंगल कार्यालय सावेडी येथे सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती ॲड. महेश शिंदे यांनी दिली.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची 3 जानेवारी रोजी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाते. त्या अनुषंगाने सावित्रीबाई फुले यांचे जीवन कार्य, त्यांचे समाज सुधारणेतील योगदान, शिक्षण क्षेत्रात केलेला संघर्ष यासह विविध विषयावर व्याख्यान किशोर डागवाले, ॲड. महेश शिंदे, अनंत द्रविड, भीमराव उल्हारे, जयश्री शिंदे, चंद्रकांत पाटोळे, ॲड. सुरेश लगड, आरती शिंदे मार्गदर्शन करणार आहेत.
सांस्कृतिक कार्यक्रमात शाहीर कान्हू सुंबे, शाहीर मंदाताई फुल सौंदर, गायक राजेंद्र उल्हारे, हमीद भाई शेख यांसह विविध लोककलावंत कवितांच्या, लोकगीतांच्या माध्यमातून प्रबोधन करणार आहेत. विद्यार्थ्यांसाठी युवक युवतींसाठी चित्रकला स्पर्धा, हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, लोकगीतांवर आधारित वैयक्तिक नृत्य स्पर्धा, समूह नृत्य स्पर्धा आदींचे आयोजन वयोगटांनुसार करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागासाठी व स्पर्धेमध्ये सहभागासाठी 992181 0096, 957961648, 9657511869 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जय युवा अकॅडमीने केलेले आहे. जास्तीत जास्त नगरकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन या पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.