कोणतीही पूर्व सूचना न देता, ठराव घेऊन करण्यात आले निलंबन
माजी सैनिकाच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ
नगर (प्रतिनिधी)- कोणतीही पूर्व सूचना व नोटीस न देता पुन्हा निलंबनाची कारवाई करण्यात आल्याने पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे क्लार्क नितीन मेहेर यांच्यावरील बेकायदेशीर निलंबन रद्द होण्यासाठी माजी सैनिक असलेल्या सुंदर मेहेर यांच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर मुलाबाळांसह उपोषण सुरु केले आहे.
नितीन मेहेर यांच्या कुटुंबीयांनी सप्टेंबर मध्ये निलंबन रद्द होऊनही पुन्हा कामावर रुजू करुन घेण्यास टाळाटाळ होत असल्याने जिल्हाधिकारी कार्यालया समोर उपोषण केले होते. यानंतर त्यांना बँकेत कामावर हजर करुन घेण्यात आले. मात्र 30 सप्टेंबर 2024 च्या मीटिंगमध्ये पारनेर तालुका सैनिक सहकारी बँक चेअरमन, संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मेहेर यांच्या निलंबनाचा ठराव घेतला. त्यानंतर दोन ते अडीच महिन्यानंतर 17 डिसेंबर 2024 ला जामखेड शाखा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाचे पत्र पाठविले. कोणतीही पूर्वसूचना व नोटीस न देता बेकायदेशीर पध्दतीने आकसापोटी ठराव घेऊन नितीन मेहेर यांचे निलंबन करण्यात आले असल्याचे मेहेर कुटुंबीयांनी आरोप केला आहे.
कुटुंबीयांवर अन्याय करण्यात आला असून, माजी सैनिकाचा मुलगा असलेल्या नितीन मेहेर याला कुटुंबीयांच्या उदरनिर्वाहासाठी एकमेव सदर नोकरीचे साधन आहे. त्यांच्यावर सर्व कुटुंबीय अवलंबून असून, त्याचे निलंबन करण्यात आल्याने कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
बँकेच्या व्यवस्थापनाने तात्काळ मेहेर यांचे निलंबन रद्द करून, त्यांना कामावर हजर करून घ्यावे, निलंबन काळातील पगार शासन नियमाप्रमाणे त्यांच्या बँक खात्यात जमा करावे, दिवाळी बोनस देण्याची मागणी करण्यात आली आहे. या उपोषणात माजी सैनिक सुंदर मेहेर, मंदा मेहर, नितीन मेहेर, सीमा मेहेर यांच्यासह संपूर्ण कुटुंबीय मुलाबाळांसह बसले आहे.