• Wed. Feb 5th, 2025

सरपंचाचे अतिक्रमण हटविण्यासाठी चिचोंडी पाटील ग्रामस्थांचे जिल्हा परिषद समोर उपोषण

ByMirror

Jan 24, 2025

पदाचा दुरुपयोग करुन सार्वजनिक रस्त्यांवर ताबा मारल्याचा आरोप

नगर (प्रतिनिधी)- सरपंचाचे अतिक्रमण हटविण्यासाठी तक्रारदारासह चिचोंडी पाटीलच्या ग्रामस्थांनी जिल्हा परिषद समोर शुक्रवारी (दि.24 जानेवारी) उपोषण केले. या उपोषणात दिलीप कोकाटे, गोपीनाथ भद्रे, सुधीर भद्रे, बाळासाहेब हजारे, विमल भद्रे, मिलिंद भद्रे, पद्माबाई भद्रे, विजय भद्रे, विठू गायकवाड आदी सहभागी झाले होते.
चिचोंडी पाटील ग्रामपंचायतला आलेल्या निधीमधून सरपंच शरद पवार यांनी बंगल्याच्या मागील पश्‍चिम बाजूस सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार केलेला आहे. त्यावर त्यांनी जनावरे बांधण्यासाठी दावण बांधलेली आहे. सदर जागेवर त्यांनी जनावरे बांधून रस्त्याला अडथळा निर्माण केलेला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर सदरील अतिक्रमण हटविण्यासाठी 2020 पासून पाठपुरावा सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.


सन 2018-19 मध्ये ग्रामनिधीतून स्मशान भूमी अंतर्गत 47 हजार खर्च करून प्रवचन ओटा व न्हावी ओटा बांधकाम करण्यात आले आहे. सदर बांधकामावर पत्र्याच्या शेडचे बांधकाम तत्कालीन उपसरपंच व विद्यमान सरपंच शरद पवार यांनी केले आहे. त्यांनी या कामावर स्वखर्चाने काम केल्याबाबतचा फलक लावलेला आहे. सदर फलक हटविण्याबाबत पाठपुरावा केल्यानंतर ग्रामविकास अधिकारी यांनी ग्रामपंचायत कार्यालयाला फलक हटविण्याचे पत्र दिले आहे, मात्र अद्यापही सदरचा फलक काढण्यात आलेला नाही.


गावाच्या एसटी स्टँड जवळ दक्षिणेकडे जाण्यासाठी एक सार्वजनिक रस्ता होता. या रस्त्यावर सरपंच यांनी लोकांची सहानुभूती मिळवून गणेशोत्सवाच्या काळात गणपती स्थापना करण्यासाठी मंडप टाकला होता. गावाच्या लोकांना सदरच्या जागेवर फक्त गणेश उत्सवासाठी मंडप टाकला असे वाटले. मात्र सार्वजनिक रस्त्यावर शरद पवारांनी पत्र्याचे शेड मारून रियल इस्टेटचा व्यवसाय सुरु केला . सार्वजनिक रस्त्यावर असलेले सदरचे अतिक्रमण हटविण्यासाठी देखील सन 2020 पासून पाठपुरावा सुरू आहे. यावर अद्यापि कारवाई झालेली नसल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
सरपंच यांनी राहत्या बंगल्याचे कंपाउंड व गाडी आत नेण्यासाठी सार्वजनिक रस्त्यावर अतिक्रमण करून रस्ता व कंपाऊंड तयार केला. ही अतिक्रमणे अनेक वर्षापासून हटविण्यात आलेली नाही. राजकीय वजन वापरुन प्रशासनावर दबाव आणले जात असल्याचे उपोषण कर्त्यांचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *