जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- सेवानिवृत्त शिक्षकांची संघटना असलेल्या अहिल्यानगर पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने शुक्रवारी (दि.24 जानेवारी) त्रैवार्षिक अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर त्रैवार्षिक अधिवेशनाचे उद्घाटन सकाळी 11 वाजता शहरातील टिळक रोड, लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात होणार असून, या अधिवेशनासाठी संघटनेच्या सर्व सेवानिवृत्त शिक्षकांना सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष द.मा. ठुबे व सरचिटणीस बन्सी उबाळे यांनी केली आहे.
त्रैवार्षिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच संघटनेच्या शहर कार्यालयात नियोजन बैठक पार पडली. यावेळी कार्यालयीन चिटणीस ए.गो. इथापे, अशोक ढसाळ, तालुका अध्यक्ष सूर्यभान काळे, तालुका सहचिटणीस बबन कुलट उपस्थित होते.
महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष एन.डी. मारणे यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन होणार आहे. यावेळी खासदार निलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार शिवाजी कर्डिले, संग्राम जगताप, विठ्ठलराव लंघे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे, प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील, महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशनचे वसंतराव सबनीस, अनंतराव पाटील, म.रा. सोनवणे, वारे, मधुकर साबळे, डी. आर. पाटील अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
या अधिवेशनात प्रामुख्याने शहरात सेवानिवृत्त शिक्षकांचे भवन उभारण्यासाठी जागेचा प्रश्न, संघटनेला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी कलम एबी खाली संस्थेची नोंदणी करणे या प्रमुख विषयावर चर्चा केली जाणार आहे. तसेच इतर विविध प्रश्नांवर चर्चा व विचार मंथन होणार असून, मागील कार्याचा आढावा घेऊन भविष्यातील वाटचाल ठरविण्यात येणार आहे. सेवानिवृत्त शिक्षकांवरील अन्याय दूर व्हावा यासाठी चर्चा करुन शासनाकडे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. या संघटनेची स्थापना होवून 40 वर्षे झाले असून, ही संघटना राज्य संघटनेला संलग्न असल्याची माहिती ठुबे व उबाळे यांनी दिली.