• Wed. Feb 5th, 2025

रामवाडीतील श्रमिक कष्टकरी वर्गाची मोफत आरोग्य तपासणी

ByMirror

Jan 21, 2025

स्माईल फाउंडेशन व आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशनचा उपक्रम; दर पंधरा दिवसांनी होणार आरोग्य शिबिर

बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कष्टकरी वर्गातील आरोग्याचा प्रश्‍न गंभीर -भाऊसाहेब उडाणशिवे

नगर (प्रतिनिधी)- स्माईल फाउंडेशन व आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशनच्या वतीने रामवाडी येथील कचरा वेचक, कष्टकरी व कामगार वर्गातील नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दर पंधरा दिवसांनी रामवाडीत शिबिर आयोजित करण्यात येणार असून, त्या मार्फत मोफत औषध व आवश्‍यतेनुसार नुसार तपासण्या करण्यात येणार आहे.


माजी नगरसेवक भाऊसाहेब उडाणशिवे यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतचे जिल्हा समन्वयक विकास उडानशिवे, डॉ. गगनकुमार मूकमोड, इरशाद शेख, ज्योती कोरी, अशोक मोकाटे, निखील तावरे, मनोहर चखाले, पप्पू उल्हारे, विकास धाडगे, अश्‍विन खुडे, अजय गायकवाड, सोनू चंदने, गौरव साळवे, प्रथमेश कोटा, गुणवंत गायकवाड, लखन खुडे, गणेश चकाले, आकाश मैड, सावी चकाले, तेजस शिंदे आदी उपस्थित होते.


भाऊसाहेब उडाणशिवे म्हणाले की, शहरातील रामवाडी ही सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. यामध्ये कष्टकरी, कचरावेचक, बांधकाम कामगार व कष्टकरी वर्ग राहत आहे. हा वर्ग दैनंदिन काम करुन पोटपाण्याचा प्रश्‍न भागवत असतो. बिकट आर्थिक परिस्थितीमुळे कष्टकरी वर्गातील आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होत चालला आहे. त्यांना आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी देखील वेळ नसतो. दवाखाना त्यांना परवडत नाही. वेळोवेळी तपासणी करुन भविष्यातील गंभीर आजाराचे धोके टाळण्यासाठी स्माईल फाउंडेशन व आदित्य बिर्ला कॅपिटल फाउंडेशनने श्रमिक कष्टकरी बांधवांसाठी घेतलेला पुढाकार कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. त्यांच्यामुळे कष्टकरी वर्गाला निरोगी आरोग्यासाठी दिशा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.


विकास उडानशिवे यांनी झोपडपट्टी भागात आरोग्याची जागृती होणे आवश्‍यक आहे. वेळेवर आजाराचे निदान झाल्यास भविष्यातील गंभीर धोके टाळता येतात. वेळोवेळी तपासणीला पैसे नसल्याने इच्छा असताना देखील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना आरोग्याकडे लक्ष देता येत नाही.

या संस्थेने सामाजिक जाणीव ठेऊन घेतलेल्या उपक्रमाबद्दल त्यांनी आभार मानले. फिरता दवाखान्याच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टरांनी रामवाडीतील नागरिक व महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तर गरजेनुसार औषधोपचार देखील देण्यात आले. या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *