शेख यांची प्राचार्यपदी झालेली निवड सर्व ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद -पै. नाना डोंगरे
नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथील आदम बशीर शेख यांची अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या श्री दुर्गादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय ढवळपुरी (ता. पारनेर) येथे प्राचार्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. शहरातील वसुंधरा पार्क विद्या कॉलनी येथे नगर तालुका तालीम सेवा संघ व स्व. पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शेख यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी विजय गाडळकर, ग्रामपंचायत सदस्य तथा नगर तालुका तालीम संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, सचिव बाळासाहेब भापकर, केशव हराळ, भाऊसाहेब शिंदे, मेजर एकनाथ खांडवी, रघुनाथ चेमटे, संदीप म्हस्के, रऊफ शेख, सुलताना शेख, सचिन झावरे आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, बिकट परिस्थितीतून शिक्षण घेऊन आदम शेख यांनी प्राचार्यपदा पर्यंतची मारलेली मजल सर्व ग्रामस्थांसाठी अभिमानास्पद आहे. जिल्ह्यातील नावाजलेल्या संस्थेच्या शाळेत त्यांना प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. सर्वात कमी वयाचे प्राचार्य म्हणून त्यांचे कार्य राहणार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे कार्य व योगदानाबद्दल त्यांची झालेली निवड सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.
सत्काराला उत्तर देताना आदम शेख यांनी शिक्षणानेच जीवनाचा कायापालट झाला. विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविताना त्यांना देखील शिक्षणाचे महत्त्व विशद करुन मार्गदर्शन केले जात आहे. सर्व मित्र परिवाराच्या वतीने झालेल्या सन्मानाने आनखी चांगले कार्य करण्यास बळ मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.