खेळामुळे निर्णय क्षमता, नेतृत्व क्षमता वाढते -डॉ. भाऊसाहेब सोनवणे
नगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील सरस्वती प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विविध कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेसह स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ. भाऊसाहेब सोनवणे हे होते. प्रा.डॉ. अरुणराव कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सहकोषाध्यक्ष प्रा.डॉ. रावसाहेब पवार, बीएड कॉलेजचे प्राचार्य अमरनाथ कुमावत, संस्था समन्वयक डॉ. रवींद्र चोभे, प्रज्ञाताई आसनीकर, माजी नगरसेवक संभाजीराजे पवार, सावेडी शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी काजळे, शाळेचे मुख्याध्यापक संदिप भोर, माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मोहिनी धर्माधिकारी, पालक प्रतिनिधी स्वातीताई कोळपळकर, विद्यार्थी प्रतिनिधी यशराज पाचारणे, विद्यार्थिनी प्रतिनिधी दिया काकडे, अविनाश साठी, शिवाजी मगर आदींसह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा.डॉ. भाऊसाहेब सोनवणे म्हणाले की, खेळामुळे निर्णय क्षमता, नेतृत्व क्षमता वाढते. या सोबतच भावनिक विकासही होतो. त्यामुळे खेळात सहभागी व्हायला हवे. स्पर्धेमध्ये शिस्त दाखवा, स्वतःमध्ये सांघिक भावना विकसित करा, अपयश आले की खचून न जाता जिद्दीने परत उभे राहून पुढे जाण्याची तयारी करण्याचे त्यांनी आवाहन केले.
जिल्हास्तरावर सुवर्ण, रौप्य, कास्य पदक पटकावून विभागीय स्तरावर यश प्राप्त करणाऱ्या खेळाडूंचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. सरस्वती विद्यालयातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासह त्यांच्यातील कलागुण विकसीत करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे उपस्थित पाहुण्यांनी कौतुक करुन विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता खिलारी व अनिता क्षीरसागर यांनी केले. सुरेखा कसबे यांनी आभार मानले.