क्रांती असंघटित कामगार संघटनेचा दहावा वर्धापन दिन साजरा
मुला-मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करण्याचे आवाहन
नगर (प्रतिनिधी)- क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या वतीने शहरातील घरेलू मोलकरणी व बांधकाम कामगारांसह क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. वाडियापार्क येथील संघटनेच्या कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात घरेलू मोलकरणी आणि बांधकाम कामगारांना विविध शासकीय योजनांची माहिती देऊन मुला-मुलींच्या उज्वल भवितव्यासाठी शिक्षणाची मशाल प्रज्वलीत करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच संघटनेचा दहावा वर्धापन कामगार वर्गाच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
बांधकाम व्यावसायिक तय्यब सय्यद व जिल्हा बांधकाम संघटनेचे सरचिटणीस नंदू डहाणे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रांती संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा अनिता कोंडा, कल्पना सामंत, रेश्मा मिरपागर, प्रमिला रोकडे, उषा बोराडे, स्वाती बोरुडे, चंदा गुंजाळ, पद्मा पादिर, सलीम शेख, अमित छत्तीसे, अनिल आजबे, अनभुले, किशोर दरेकर आदींसह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनिता कोंडा म्हणाल्या की, क्रांती असंघटित कामगार संघटना समाजातील असंघटित कामगारांना न्याय देण्याच्या भूमीकेतून कार्यरत आहे. घरेलू मोलकरीन व बांधकाम कामगारांना त्यांचे हक्के व शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. समाजात नाहिरे व अहिरे गटातील विषमतेची दरी वाढत असताना समाजात समता प्रस्थापित होण्यासाठी सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या विचारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
तय्यब सय्यद यांनी समाजातील आर्थिक विषमता दूर करण्यासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या विचाराने लढा द्यावा लागणार आहे. सावित्रीबाईंनी महिलांना शिक्षणाचे दारे उघडे केल्याने महिला विविध क्षेत्रात उंच भरारी घेत आहे. विविध उच्च पदावर महिला विराजमान असल्याचे त्यांनी सांगितले. नंदू डहाणे यांनी चूल व मूल या चौकटीबाहेर महिलांनी पडले पाहिजे. बिकट परिस्थितीपुढे न डगमगता मुलांना उच्च शिक्षित करण्याचे आवाहन केले. शिक्षणाने सामाजिक, आर्थिक व वैचारिक गुलामगिरीतून मुक्ती मिळवता येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.