• Wed. Oct 15th, 2025

देशात राहून देशाची बदनामी करणाऱ्या राणेंवर खटला दाखल करण्याची मागणी

ByMirror

Jan 2, 2025

केरळ राज्याला मीनी पाकिस्तान म्हणणाऱ्या राणेंचा दिवटा नितिशला बडतर्फ करा -कॉ. सुभाष लांडे

भाकपच्या वतीने वक्तव्याचा निषेध

नगर (प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळात मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या नितेश राणे याने केरळ राज्य मिनी पाकिस्तान आहे, म्हणून तेथून राहुल गांधी व प्रियांका गांधी निवडून येतात! अशी गरळ ओकत बेताल वक्तव्य केले आहे. केरळ राज्याला मीनी पाकिस्तान म्हणून वक्तव्य करणाऱ्या राणेंचा दिवटा नितिशला बडतर्फ करण्याची मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने राज्य सचिव कॉ.ॲड. सुभाष लांडे यांनी केली आहे.


केरळ राज्य हे देशातील राजकीय दृष्ट्या अतिशय सजग व प्रगत राज्य आहे. 100 टक्के साक्षर व डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर असलेल्या केरळ राज्याची कोरोना काळात आरोग्य सेवेसाठी केरळ पॅटर्न म्हणून देश व जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली होती. देशाला सर्वाधिक परकीय चलन मिळवून देणारे, पर्यटन विकासासाठी आघाडीवर असणाऱ्या अशा राज्याला मीनी पाकिस्तान म्हणून केरळच्या व भारतीय जनतेचा अपमान केला आहे. केरळ राज्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करण्याची राणेची लायकी नाही. राज्याचा मंत्री या संविधानिक पदावर असलेल्या राणे यांचा मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा घ्यावा, बडतर्फ करण्याची मागणी कॉ. लांडे यांनी केली आहे.


भाजपाने राणे कुटुंब धार्मिक तेढ वाढवून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी नेमलेले आहे की काय? हा प्रश्‍न उपस्थित करुन नितेश राणे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहे. राणे यांचे वक्तव्य केवळ निषेधार्ह नसून भारतीय संघराज्याची प्रतिमा खराब करणारे व दोन समाजात तेढ निर्माण करणारे आहे. देशात राहून देशाची बदनामी करणाऱ्या राणेंवर खटला दाखल करण्यात यावा व ताबडतोब अटक करण्यात यावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *