• Thu. Jan 22nd, 2026

भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षाचा स्नेहमेळावा उत्साहात

ByMirror

Dec 28, 2024

जुन्या पिढीतील कम्युनिस्टांचा झाला गौरव; लाल सलामच्या घोषणा

सध्याच्या पिढीला धर्मसत्ताक उन्मादाशी तीव्र संघर्ष करावा लागणार -निरंजन टकले

नगर (प्रतिनिधी)- मागच्या पिढीने किंमत चुकवली म्हणून स्वातंत्र्यानंतर आपली पिढी स्वातंत्र्य व धर्मनिरपेक्षपणे बहरली व फुलली. मात्र सध्या पुन्हा स्वातंत्र्यावर मर्यादा आनल्या जात असल्याने आजच्या पिढीला आपल्या भावी पिढीसाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे. स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर देशात उन्मादी वातावरण येऊ पाहत आहे. सध्याच्या पिढीला धर्मसत्ताक उन्मादाशी तीव्र संघर्ष करावा लागणार आहे. देशातील अल्पसंख्यांकांना वेठीस धरून भयग्रस्त वातावरण निर्माण करण्याचा अजेंडा राबविला जात आहे. सर्व व्यवस्थेत भय निर्माण करण्यात आले असून, या शक्ती विरोधात लढा देण्यासाठी पुन्हा स्वातंत्र्य, समता, बंधूता या संविधानाच्या मुल्यांचा पुरस्कार करून शोषणाच्या विरोधात उभे रहावे लागणार असल्याचे प्रतिपादन शोध पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी केले.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरात धर्मनिरपेक्ष पक्ष संघटना कार्यकर्त्यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात टकले बोलत होते. टिळक रोड येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ.कॉ.भालचंद्र कानगो यांच्य अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्याप्रसंगी राज्य सचिव कॉ.ॲड. सुभाष लांडे, भाकपच्या राज्य सचिव मंडळ सदस्या कॉ. स्मिता पानसरे, जिल्हा सेक्रेटरी कॉ.ॲड. बन्सी सातपुते, सह सचिव कॉ. सुधीर टोकेकर, कॉ. संतोष खोडदे, कॉ. संजय नांगरे, फिरोज शेख, भारती न्यालपेल्ली, कॉ. महेबुब सय्यद आदींसह भाकप, डावी आघाडी व समविचारी पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे टकले म्हणाले की, हिंदू धर्म हा सहिष्णू असून, या धर्माची सोयीप्रमाणे वाताहात करून इतर धर्मीयांवर सत्ता राबवली जात आहे. विधानसभा निवडणुकीतून धार्मिक ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात दिसून आले, उघड-उघड धार्मिक द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहे. या विरोधात निवडणूक आयोग देखील गप्प बसत आहे. सर्वसामान्यांच्या मनातील संवेदनशीलता संपवली जात आहे. आमच्या आजोबा-पंजोबांनी ब्रिटिशांविरुद्ध लढा देऊन, जिथे सूर्य मावळत नाही त्यांची सत्ता उलथून लावली. तर या खोट्याच्या आधारावर मिळवलेली सत्ता उलथवण्यास वेळ लागणार नाही. गांधी, नेहरूनंतर बाबासाहेबांच्या बदनामीचे षडयंत्र सुरू झाले आहे. धर्मांध शक्तीशी लढा देण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून पुढे जावे लागणार आहे. साधूंच्या रुपात आलेल्यांचे खरे रूप समाजासमोर आणावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर अभिमानाने सांगता येणारे व गौरवास्पद संघर्षमय असलेला आमचा इतिहास असल्याचे स्पष्ट केले.


प्रास्ताविकात कॉ.ॲड. बन्सी सातपुते म्हणाले की, कम्युनिस्ट पक्ष स्थापनेनंतर इंग्रजांशी भूमिगत राहून कम्युनिस्टांनी लढा दिला. स्वातंत्र्य चळवळीत मोठे योगदान देऊन देश स्वातंत्र्यानंतर देखील लोकशाही मार्गाने काम करून शोषणमुक्त समाज निर्मितीसाठी कार्य केले. संघर्ष व बलिदानाची परंपरा असलेला हा पक्ष असल्याचे स्पष्ट करुन, धर्म हा देश उभारणीचा पाया होऊ शकत नाही. धर्मांधशक्ती विरोधात पुन्हा लढा उभारावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रारंभी भारताचे दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पक्षातील दिवंगत पदाधिकारी व कार्यकर्ते यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांच्या हस्ते कम्युनिस्ट पक्षाच्या शंभर वर्षाचा इतिहास सांगणाऱ्या व विविध ऐतिहासिक घटनांना उजाळा देणाऱ्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.


ॲड. सुभाष लांडे म्हणाले की, जिल्ह्यातील प्रत्येक ज्येष्ठ कम्युनिस्टांना घरोघरी जावून सन्मान केला जाणार आहे. त्यांनी निष्ठेने केलेले आज सर्वांसाठी स्फुर्ती देणारे आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करुन जिल्ह्यात पुन्हा कम्युनिस्ट विचार रुजवण्याचे काम केले जाणार आहे. वंचितांना न्याय देण्यासाठी ताकतीने उठाव करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कॉ. भालचंद्र कांगो म्हणाले की, तत्त्वनिष्ठेने कार्य केलेल्या कार्यकर्त्यांचा सन्मान हा सर्वांसाठी प्रेरक ठरणार आहे. थापा मारून सत्तेवर आलेले सत्ताधारी देशात फॅसिस्टवादचा पुरस्कार करत आहे. अन्याय, अत्याचार तेवढेच आक्रमकतेने वाढत आहे. विषमता, बेरोजगारी, महागाई वाढत असताना राष्ट्रवाद जनतेसमोर उभा केला जात आहे. आपल्या सोयीप्रमाणे राष्ट्रभक्तीचे चित्र निर्माण करुन ही राष्ट्रभक्ती फक्त अदानी, अंबानी या प्रस्थापितांना श्रीमंत करणारी आहे. धर्माचे प्राबल्य वाढल्याने व्यक्ती स्वातंत्र्य हिरावले जाणार आहे. भारत मोठ्या प्रमाणात शस्त्रांचा निर्यातदार होवून साम्राज्यवादी युद्धाचा भाग बनणार आहे. सर्वसामान्यांना मानसिक गुलामगिरीत अडविले जात असताना या विरोधात भूमिका घेऊन कार्य करावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर लढेंगे जितेंगे… च्या घोषणा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शर्मिला गोसावी यांनी केले. आभार कॉ. सुधीर टोकेकर यांनी मानले.



जिल्ह्यातील ज्येष्ठ कम्युनिस्टांचा झाला सन्मान
भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरात झालेल्या स्नेहमेळाव्यात जिल्ह्यातील ज्येष्ठ कम्युनिस्टांचा गौरवपूर्ण सन्मान करण्यात आला. प्रत्येक तालुक्यातील माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कॉम्रेड लाल सलामच्या घोषणांनी सभागृह दणाणले. तर इन्कालब जिंदाबाच्या घोषणेने कार्यक्रमात उत्साह संचारला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *