ठेका परत मिळण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे 6 जानेवारी पासून उपोषणाचा इशारा
उपविभागीय जलसंधारण अधिकारीच्या अनागोंदी कारभारामुळे महिलेच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ
नगर (प्रतिनिधी)- स्थानिक आदिवासी महिलेला डावलून व कोणतीही पूर्व कल्पना न देता मौजे गोळेगाव (ता. शेवगाव) येथील पाझर तलावातील मत्स्य पालनचा ठेका दुसऱ्या व्यक्तीला दिल्याप्रकरणी चौकशी करुन स्थानिक आदिवासी महिलेला ठेका परत देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. उपविभागीय जलसंधारण अधिकारीच्या अनागोंदी कारभारामुळे मत्स्य पालनचा व्यवसाय करणाऱ्या कुसूम पवार या महिलेच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर सदर महिलेला न्याय मिळण्यासाठी 6 जानेवारी पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कुसुम अंकुश पवार या मौजे गोळेगाव (ता. शेवगाव) येथे राहत असून, त्यांचे पती अपंग आहेत. त्या स्वत: सन 2001 पासून पाझर तलावातील मत्स्य पालनचा ठेका घेऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्या सरकारी नियमानुसार ग्रामपंचायत करून टेंडर घेऊन व्यवसाय करीत असताना 12 मार्च रोजी गोळेगाव ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांना उपविभागीय जलसंधारण अधिकारी जिल्हा परिषद (नेवासा) यांनी नोटीस देऊन तलाशयाचा ताबा सोडण्याचे सांगितले. सरकारी नियमानुसार तळ्याचे टेंडर संपत आले असले तरी, संबंधित ग्रामपंचायत, ग्रामसेवक व पूर्वीच्या ठेकेदारास दोन महिने अगोदर नोटीस देणे आवश्यक होते. तरी देखील त्यांना नोटीस न देता परस्पर हा ठेका दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याप्रकरणी पाठपुरावा केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले असताना संबंधित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी लघुपाटबंधारे, बीडीओ, ग्रामसेवक यांच्यावर कुठलीही कारवाई न करता देण्यात आलेल्या पत्राला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. कुसुम पवार या भिल्ल समाजाच्या असून अशिक्षित व भूमीहीन आहे. त्यांचे कुटुंबीय पूर्णत: मत्स्य व्यवसायावर अवलंबून आहे. ते स्थानिक असताना देखील सदरचा ठेका लांब राहणाऱ्या व्यक्तीला देण्यात आला आहे. एक प्रकारचा त्यांच्यावर अन्याय झालेला आहे. या अन्यायाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ढवळे यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.