जिल्ह्याला गायन कलेची मोठी परंपरा -ज्ञानदेव पांडुळे
उत्कृष्ट गायन शैलीने बालकलाकारांनी जिंकली मने
नगर (प्रतिनिधी)- नगर जिल्ह्याला गायन कलेची मोठी परंपरा आहे. सामाजिक प्रबोधनासह मनोरंजनाचे कार्य गायक करत आहे. अनेक दिग्गज कलावंत या मातीतून घडले असून, भविष्यातील कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी गायन स्पर्धा घेतली जात असल्याची भावना रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे यांनी व्यक्त केली.

कर्मवीर विद्या प्रबोधिनी व रयत शिक्षण संस्था उत्तर विभागच्या वतीने आयोजित गायन स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी पांडुळे बोलत होते. याप्रसंगी रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे, बाबासाहेब नाईकवाडी, गुणवत्ता कक्ष प्रमुख काकासाहेब वाळुंजकर, बोडखे, विभाग प्रमुख राजनारायण पांडुळे उपस्थित होते.
पुढे पांडुळे म्हणाले की, पंडित नगरकर यांची भूपाळी आज ही गाजत आहे. हा वारसा पवन नाईक व खरवंडीकर पुढे चालवत आहे. विद्यार्थी घडावेत त्यांना कला क्षेत्रात संधी मिळावी या एकमेव उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन केले जाते. आज रयतचे विद्यार्थी असलेले कलाकार महाराष्ट्र गाजवत आहे. वेगवेगळ्या मालिकेत त्यांना संधी मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थित पाहुण्यांनी स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. बुरुडगाव रोड येथील रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाच्या कार्यालयात ही स्पर्धा रंगली होती. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी भक्ती गीत, सांस्कृतिक गीत, कव्वाली, पोवाडे, शाहिरी गीत सादर केले. यामध्ये इयत्ता पहिली पासून ते इयत्ता बारावी पर्यंतचे युवक युवती सहभागी झाल्या होत्या. आपल्या उत्कृष्ट गायन शैलीने बालकलाकारांनी उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेचे परीक्षण राजेंद्र बडे, अपर्णा रोहकले, विवेक गहाणडुले, संतोष सरसमकर यांनी केले.
