• Wed. Oct 15th, 2025

श्रमिकनगरच्या श्री मार्कंडेय शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात

ByMirror

Dec 23, 2024

विद्यार्थ्यांनी घडविले भारतीय संस्कृतीचे दर्शन; मुलींनी केला स्त्री शक्तीचा जागर

जीवनात प्रत्येक स्पर्धेत उतरा -यशवंत डांगे

नगर (प्रतिनिधी)- जीवनात प्रत्येक स्पर्धेत उतरा, स्पर्धेने आपल्यातील क्षमता कळते व पुढे जाण्याची उमेद निर्माण होते. जय-पराजयाची पर्वा न करता प्रत्येक शर्यतीत उतरुन स्वत:ला सिध्द करण्याचे आवाहन मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी विद्यार्थ्यांना केले.
पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाच्या श्रमिकनगर येथील श्री मार्कंडेय प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाप्रसंगी मनपा आयुक्त डांगे बोलत होते. पद्मशाली विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण सिद्दम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र (भैय्या) गंधे, मनपाचे माजी सभागृह नेते मनोज दुलम, सचिव विनायक गुडेवार, सहसचिव सविता कोटा, विश्‍वस्त राजेंद्र म्याना, शंकर सामलेटी, भिमराज कोडम, नवनिर्वाचित संचालिका स्नेहा छिंदम, श्रमिक जनता हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन विलास सग्गम, सचिव शंकर येमूल, श्रमिक बालाजी देवस्थानचे अध्यक्ष विनोद म्याना, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे अध्यक्ष अजय पिसुटे, शिक्षक प्रतिनिधी सुलभा सुरकुटला, जयश्री चिंतल, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका विद्या दगडे, माध्यमिकचे मुख्याध्यापक शशीकांत गोरे आदींसह शालेय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे बोलताना डांगे म्हणाले की, मुले पालकांचे अनुकरण करतात. पालक मोबाईलपासून लांब राहिल्यास मुले देखील मोबाईलपासून लांब राहतील. आपल्या नावाने आई-वडिलांचा परिचय व्हावा, एवढे यश प्रत्येक विद्यार्थ्यांनी जीवनात नक्की मिळवावे, असे त्यांनी सांगितले.
शालेय विद्यार्थ्यांनी ढोल व लेझीम पथकासह फुलांचा वर्षाव करुन पाहुण्यांचे स्वागत केले. प्रारंभी बालाजी मंदिरात आरती करून उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या गणित-विज्ञान, रांगोळी, चित्रकला व हस्तकला प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थिनींनी स्वागतगीत व ईशस्तवन सादर केले.


प्रास्ताविकात मुख्याध्यापिका विद्या दगडे म्हणाल्या की, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या कामगार वर्गाच्या पाल्यांना शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. विद्यार्थ्यांच्या संस्कारासाठी व बौद्धिक विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाहुण्यांचा परिचय माध्यमिकचे मुख्याध्यापक शशिकांत गोरे व भारतीय गाडेकर यांनी करून दिला. शालेय विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात मिळवलेल्या यशाचे अहवाल वाचन भीमराज कोडम यांनी केले. कला, क्रीडा, शैक्षणिक व विविध स्पर्धेत नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. आदर्श पालक म्हणून प्रियंका पासकंटी, नूती राजेश व आदर्श विद्यार्थी म्हणून प्रेक्षा जोरगील, आदिती राऊत, विजय पाटपेल्ली, वेदांत झुंजूर यांना सन्मानित करण्यात आले. किरण कहेकर व अर्चना शिंदे या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सहकार्याने संपादित केलेल्या भारतीय संस्कृतीतील विविधतेतील एकता या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले.


महेंद्र गंधे म्हणाले की, प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे गुण मिळतात. कठोर परिश्रम शिवाय पर्याय नाही. परिश्रम जिद्द चिकाटीने यश मिळते. सर्वसामान्यांच्या मुलांना घडविण्याचे कार्य मार्कंडेय शाळेत होत आहे. या शाळेच्या अद्यावत इमारतीसाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. तर या भागातील सर्वसामान्यांसाठी रुग्णालय उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
बाळकृष्ण सिद्दम यांनी विजयाने हुरळून जाऊ नका व पराभवाने खचू नका. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण दडलेले असतात ते शिक्षक व पालकांना ओळखता आले पाहिजे. विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचे सोने करण्याचे त्यांनी सांगितले.


विद्यार्थ्यांनी भक्तीगीतांसह सांस्कृतिक कार्यक्रमातून भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविले. शालेय विद्यार्थिनींनी देवीच्या गीतांमधून स्त्री शक्तीचा जागर केला. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमावर सादर केलेल्या गीतांमधून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह संचारला होता. शिवाजी महाराजांच्या जय घोषाने परिसर दुमदुमले. पारंपारिक लोकगीतांनी उपस्थितांची मने जिंकली. तर टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली वरुडे, सुचिता भावसार तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलभा सुरकुटला व मिनाक्षी बिंगेवार यांनी केले. आभार किरण कहेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *