स्पर्धेत सहभागी होणारा जिल्ह्यातील पहिला संघ
शनिवारी पहिला सामना सिम्बियन्स स्पोर्ट्स अकॅडमी, मुंबई विरोधात
नगर (प्रतिनिधी)- वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनद्वारे आयोजित महाराष्ट्र स्टेट युथ लीग 2024-25 साठी शुक्रवारी (दि.13 डिसेंबर) फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीचा 13 वर्षा खालील फुटबॉलचा संघ लोणावळ्याला रवाना झाला आहे. या स्पर्धेमधून महाराष्ट्रातील 2 सर्वोत्तम संघ राष्ट्रीय स्तरावरील ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन युथ लीगसाठी पात्र होणार आहे. स्पर्धेदरम्यान भारतातील नामांकित क्लब आणि अकॅडमीचे स्काउट्स खेळाडूंचे परीक्षण करणार आहेत.
लोणावळा (जि. पुणे) येथील सिंहगड विद्यापीठ येथे ही स्पर्धा पुढील 3 महिने चालणार आहे. महाराष्ट्र स्टेट युथ लीगसाठी फक्त 8 संघांना प्रवेश दिला जातो. प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील पहिला संघ म्हणून सहभागी होण्याचा ऐतिहासिक मान फिरोदिया शिवाजीयन्स अकॅडमीला मिळाला आहे.
संघाचा पहिला सामना शनिवारी (दि.14 डिसेंबर) सिम्बियन्स स्पोर्ट्स अकॅडमी, मुंबई विरोधात होणार आहे. शिवाजीयन्स स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मनोज वाळवेकर आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाऊंडेशन ट्रस्टचे मुख्य विश्वस्त नरेंद्र फिरोदिया यांनी खेळाडूंचे अभिनंदन करुन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. संघ व्यवस्थापनात मुख्य प्रशिक्षक अभिषेक सोनावणे, सहाय्यक प्रशिक्षक जोनाथन जोसेफ, संघ व्यवस्थापक राजेश अँथोनी, फिजिओ डॉ. अर्शी बगदादी योगदान देत आहे.
पल्लवी सैंदाणे, जेव्हिअर स्वामी, सचिन पाथरे तसेच माजी खेळाडू आणि विद्यमान वरिष्ठ संघाच्या सदस्यांनी केलेल्या निस्वार्थ परिश्रमांमुळे संघ महाराष्ट्र स्टेट युथ लीगसाठी निवडला गेला आहे. हा ऐतिहासिक क्षण अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन, अहमदनगर कॉलेज, समर्पित खेळाडू आणि अहमदनगरच्या लोकांच्या पाठिंब्याशिवाय शक्य झाला नसता, अशी भावना नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केली आहे. संघाला प्रायोजकत्व देणारे आय लव्ह नगर आणि ग्रोथ एक्स चे खेळाडूंनी आभार मानले आहे.