कायद्याच्या मसुद्यासंदर्भात करणार चर्चा
लोकशाही संरक्षण कायदा आणण्यासाठी शिष्टमंडळ जाणार डॉ. बाबा आढाव यांच्या भेटीला
नगर (प्रतिनिधी)- देशात लोकशाही संरक्षण कायदा आणण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन आणि वकील संघटनांच्या माध्यमातून डॉ. बाबा आढाव यांची भेट घेतली जाणार आहे. जयप्रकाश नारायण यांच्या तोडीचा नेता डॉ. बाबा आढाव यांच्या स्वरूपात असून, लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही संरक्षण कायद्याची गरज असल्याने कॉ. बाबा आरगडे, ॲड. रंजना गवांदे, अविनाश पाटील, वकील संघाचे ॲड. अशोक कोठारी, ॲड. विश्वासराव आठरे, पुणे येथे जाऊन पुढच्या आठवड्यात डॉ. आढाव यांची भेट घेऊन सदर विषयावर चर्चा करणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
मतदार अक्कलमारीच्या माध्यमातून मध्यप्रदेश, हरीयाना आणि महाराष्ट्रात मागच्या दाराने सत्ताधाऱ्यांनी सत्ता काबीज केली. त्याच वेळेला ईव्हीएम मशीन बाबत देखील तमाम जनतेच्या मनात शंका आहे. यामुळे देशातील लोकशाहीला धोका पोहोचला आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधातील उमेदवार कोणालाही माहिती नसताना देखील तो निवडून आला आणि बाळासाहेब थोरात यांचे तालुक्यासाठीचे मोठे कार्य मागे पडले. यातील परिपक्व व लोकशाही ऐवजी देशात दिव्यांग लोकशाही येत असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
देशातील निवृत्त झालेले सरन्यायाधीश त्याशिवाय विविध उच्च न्यायालयातील निवृत्त झालेले मुख्य न्यायाधीश आणि निवृत्त हायकोर्टचे न्यायाधीश आणि देशभरातील नावाजलेल्या वकीलांची मदत घेऊन लोकशाही संरक्षण कायदा अतिशय चांगल्या पद्धतीने आणता येणार असल्याची भावना ॲड. अशोक कोठारी यांनी व्यक्त केली आहे.
डॉ. बाबा आढाव हे महात्मा फुले यांचे अनुयायी आहेत. त्यांनी 50 वर्षांपूर्वी जातीव्यवस्था संपवण्यासाठी एक गाव एक पाणवठा चळवळ चालवली आणि त्याला यश देखील आले. डॉ. आढाव यांचे चारित्र्य अतिशय स्वच्छ आणि कार्यक्षम आहे. त्यांचे वय 94 च्या आसपास असले, तरी नुकतेच त्यांनी उपोषण केले होते. तर धर्माचे आधारे देशांमध्ये दिव्यांग शासनपद्धती आणण्याचा निषेध केला होता. त्यामुळे देशभरात लोकशाही संरक्षण कायद्याबाबत मोठी आस्था निर्माण झाली आहे. भारतातील लोकशाही आणि शासन पद्धती दिव्यांग कायद्याकडे झुकत आहे आणि त्यातून भारतातील लोकशाही कृष्णविवरात जाण्याची शक्यता असल्याची खंत ॲड. कारभारी गवळी यांनी व्यक्त केली.
भारतातील सध्याचे सत्ताधारी धार्मिक बहुमताच्या जोरावर पुन्हा एकदा मनुवादी तत्त्वप्रणालीप्रमाणे दिव्यांग शासन पद्धती लादू पाहत आहे. त्यातून या देशांमध्ये यादवीची बीजे पेरली जात आहे. त्यामुळे मी, माझे, मला ही तमस प्रवृत्ती पूर्णपणे संपवून आम्ही, आमची आणि आम्हाला या राजस प्रवृत्तीला सुद्धा मागे टाकून आपण सर्व, आपणा सर्वांचे आणि आपण सर्वांसाठी अशा स्वरूपात भारतीय संविधानाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. यासाठी लोकशाही संरक्षण कायदा आणण्याची आवश्यकता ॲड. रंजना गवंदे यांनी व्यक्त केली.
डॉ. बाबा आढाव यांनी लोकशाही बचाव कार्यक्रमाचा भाग म्हणून केलेल्या उपोषणाला संपूर्ण देशात चर्चेचे मोठे स्वरूप आले. मोठ्या कष्टाने मिळवलेल्या देशाचे स्वातंत्र्य सत्तापेंढारी यांनी उभारलेल्या कुबेरशाहीच्या तिजोरीत बंद होऊ नये, यासाठी कार्यकर्त्यांचा अटाकोट प्रयत्न आहे. त्याला समविचारी देशभरातील वकील मंडळी सहकार्य करतील अशी भूमिका ॲड. विश्वासराव आठरे यांनी मांडली आहे.