• Wed. Mar 12th, 2025

दिवंगत निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांना शहरात दिली जाणार भारतीय लोकशाही रत्न राष्ट्रीय मानवंदना

ByMirror

Nov 16, 2024

त्याचवेळी भारताच्या निवडणूक आयोगाला पगारहमी पांढरा मकात्या करणार जाहीर

पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदचा पुढाकार; सत्तापेंढाऱ्यांविरोधात निवडणूक आयोग कारवाई करत नसल्याचा आरोप

नगर (प्रतिनिधी)- भारताचे दिवंगत निवडणूक आयुक्त टी.एन. शेषन यांना पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदच्या वतीने रविवारी (दि.17 नोव्हेंबर) सकाळी 11 वाजता नगरच्या हुतात्मा स्मारकात भारतीय लोकशाही रत्न राष्ट्रीय मानवंदना दिली जाणार आहे. तर त्याचवेळी भारताच्या निवडणूक आयोगाला संघटनांच्या पुढाकाराने पगारहमी पांढरा मकात्या अशा प्रकारचा हेटाळणी करणारा किताब दिला जाणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली.


स्वातंत्र्योत्तर गेल्या 20 ते 25 वर्षात इंग्रजांच्या शोषक वृत्तीला साजेशी अशी सत्तापेंढारी कुबेरशाही सर्रास राबवली जात आहे. त्याला भारताचा निवडणूक आयोग पूर्णपणे कारणीभूत आहे. सध्याच्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत कारण नसताना हजार लोकांना जिल्हाबाहेर काढण्यासाठी कोर्टकचेऱ्यांचा वापर करण्यात आला. हजारो लोकांविरुद्ध खटले भरण्यात आले. त्याच पुढाऱ्यांच्या दररोज नाटकी पद्धतीने बॅगा तपासल्या जात आहेत. एवढेच काय रिक्षावाल्यांचे खिसे देखील तपासण्यासाठी निवडणूक आयोगाचे लोक वेळ आणि पैसा खर्च करीत आहे, पण त्यातून काही एक निष्पन्न होत नाही.


निवडणूक आयोगाने देशातील तमाम जनतेला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय न्याय मिळवून देणाऱ्या उमेदवारांना जनतेने संधी द्यावी यासाठी सर्व काही प्रयत्न करण्याची गरज आहे. मतदारांमध्ये जागृती करणाऱ्या संघटनांच्या विरुद्ध निवडणूक आचारसंहितेच्या नावाखाली अन्याय सुरू आहे. गेली अनेक वर्ष ज्यांच्याकडे धन. दंडेली आहे आणि ज्यांनी मागच्या दाराने सत्ता मिळण्यात प्राविण्य मिळवले आहे. अशा सत्तापेंढारी विरुद्ध निवडणूक आयोगाने काही एक कारवाई केली नाही. गेले अनेक वर्ष प्रत्येक निवडणुकीत आकाशातील तारे देखील मतदारांना आणून देऊ, असे बडेजाव घोषणा करणाऱ्या पुढाऱ्यांविरुध्द निवडणूक आयोगांना काही एक कारवाई करता आली नाही. एकंदरीत सध्याचा निवडणूक आयोग पगारहमी वरचा पांढरा हत्ती जनतेच्या पैशातून पोसला जात असल्याचा आरोप संघटनांच्या वतीने करण्यात आला आहे.


मतदारांना 3 ते 5 हजार रुपये वाटले जातात आणि गावोगावी शेकडोच्या संख्येने जेवणावळी सुरू आहे. ही बाब निवडणूक आयोगाला माहीत असूनही, त्यांच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. सध्याची नोकरशाही सत्ताधाऱ्यांच्या मर्जीप्रमाणे निवडणूक आयोगाचे कातडे पांघरून सत्तापेंढाऱ्यांना मदत करीत असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.


हुतात्मा स्मारकात सध्याचे निवडणूक आयोगाला पगारहमी वरचा पांढरा मकात्या म्हणून संघटना घोषित करणार आहे. त्याच वेळी लोकशाहीला बळकट करण्यासाठी दिवंगत निवडणूक आयुक्त टी.एन. शेषण यांनी केलेल्या अफलातून कामगिरीसाठी भारतीय लोकशाही रत्न अशी राष्ट्रीय मानवंदना त्यांना दिली जाणार आहे. या मानवंदनेसाठी ॲड. कारभारी गवळी, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, डॉ. रमाकांत मरकड, डॉ. महेबूब शेख, रईस शेख आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *