• Wed. Jul 2nd, 2025

शेतकऱ्यांना सोलर जलपंपसाठी कर्जतला मिळणार सेवा

ByMirror

Oct 28, 2024

नाथकृपा सोलर कार्पोरेट कार्यालयाचा शुभारंभ

भारनियमन व वारंवार विद्युत पुरवठा खंडित होण्यापासून मिळणार मुक्तता

नगर (प्रतिनिधी)- शेतकऱ्यांच्या शेतीपूरक विद्युत पुरवठ्यावर पर्याय म्हणून वरदान ठरणाऱ्या सोलर प्रकल्पाच्या इकोझेन कंपनीच्या नाथकृपा सोलर कार्पोरेट कार्यालयाचा शुभारंभ इकोझेन कंपनीचे प्रेसिडेंट सचिन सिंग यांच्या हस्ते झाले. कुळधरण रोड (ता. कर्जत) येथे झालेल्या या दालनामुळे शेतकऱ्यांना वारंवारच्या भारनियमनाच्या त्रासापासून मुक्तता मिळणार असून, भारत सरकारच्या पीएम कुसुम आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री सौर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना घेता येणार आहे.


शेतीपूरक विद्युत पुरवठ्यावर पर्याय म्हणून शेतकरी वर्गाची इकोझेन कंपनीच्या सोलर जलपंपला पसंती मिळत आहे. नाथकृपा सोलरने 5 हजार पेक्षा जास्त सोलर पंप बसवले असून, संपूर्ण जिल्हा सोलरमय करुन शेती धंद्याला गती देण्याचा प्रयत्न असल्याचा मानस नाथकृपाचे संचालक अविन तापकीर यांनी सांगितले. तर शासनाची पीएम कुसुम किंवा मुख्यमंत्री सोलर योजना म्हणजे विजेच्या लपंडावाने त्रासलेल्या बळीराजाच्या पाठीवर धीराची थाप देणारी महत्त्वाकांक्षी आणि कामधेनू ठरणारी योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


सचिन सिंग म्हणाले की, सौर जलपंप हे शेतकऱ्यांच्या विकासासाठी व चांगल्या उत्पादनासाठी क्रांतीमय ठरणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी सुमारे अडीच ते तीन हजार पंप बसविण्यात आले आहेत. भारत सरकारच्या पीएम कुसुम आणि महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री सौर योजनेच्या माध्यमातून अंदाजे तीन लाख पंप जिल्ह्यात बसवण्याचे शासनाचे लक्ष्य आहे. यामध्ये इकोझोन कंपनी महिंद्रासोबत काम करत असून, 2010 मध्ये इकोझेनची सुरुवात आयआयटी मधील तरुणांनी केले असल्याचे सांगितले.


अरोही तापकीर यांनी प्रास्ताविकात इकोझेन कंपनीच्या सोलर पंपची माहिती दिली व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी विद्युत महावितरणचे एसडिओ प्रवीण वारे, महिंद्रा ॲण्ड महिंद्राचे सुशांत बालवडकर, गोपाल शर्मा, रोहित रायजादा, स्नेहज स्नेहा, शिवभूषण सिंग, नवीन बंसल, मार्केट कमिटी चेअरमन काकासाहेब तापकीर, संचालक वसंत कांबळे, माजी सरपंच किशोर तापकीर, रातेजनचे सरपंच विकास झांबरे आदी उपस्थित होते.


जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी दिवाळी विशेष सवलत जाहीर करण्यात आली असून, इकोझेट कंपनी निवडल्यास ऑनलाईन बुकिंग सेवा मोफत मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विना दिघे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नाथकृपा टीमने परिश्रम घेतले. यावेळी नवनाथ तापकीर, लता तापकीर, मारुती तापकीर, प्रवीण तापकीर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *