• Tue. Dec 2nd, 2025

दिवाळी पाडव्याला घरकुल वंचितांची होणार लोकशाही बुकात नोंद

ByMirror

Oct 25, 2024

पोकळ आश्‍वासने देऊन सत्ताधाऱ्यांनी फक्त घरकुल वंचितांच्या मतांचा मलिदा लाटल्याचा आरोप

घरकुल वंचितांसाठी केलेल्या घोषणांचा होणार सूर्यनामा

नगर (प्रतिनिधी)- शहरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या वीस हजार घरकुल वंचितांना आजपर्यंत एकही घर मिळालेले नाही. फक्त आश्‍वासने देऊन घरकुल वंचितांच्या मतांचा मलिदा लाटण्याचे काम सत्ताधारी यांनी केले असून, दिवाळी पाडव्याला शनिवारी (दि.2 नोव्हेंबर) हुतात्मा स्मारकात घरकुल वंचित आपली लोकशाही बुकात नोंद करुन सरकारने घरकुल वंचितांसाठी केलेल्या घोषणांचा सूर्यनामा करणार असल्याची माहिती ॲड. कारभारी गवळी यांनी दिली.
पीपल्स हेल्पलाइन आणि भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने शनिवारी सकाळी 11 वाजता हा सूर्य, हा पुतना मावशीचा कुंपणावर बसलेला लोकमकात्या आणि हे स्वातंत्र्यातील 77 वर्षानंतर सुद्धा घर निवारा न मिळालेले घरकुल वंचित असा सूर्यनाम्याचा स्वरुप असणार आहे.


लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीचा दीपस्तंभ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून हा सूर्यनामा केला जाणार आहे. सन 2015 नंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजनेद्वारे घरकुल वंचितांना घर (निवारा) देण्याची घोषणा केली. शहरी भागामध्ये मोकळ्या जागांचे बाजार भाव गगनाला भिडले आहेत. हजारो गुंठा मंत्र्यांनी या संधीचा फायदा उठविला. त्यातच नगर शहरासह संपूर्ण महाराष्ट्रात ताबेमारी, गुन्हेगारी, टक्केवारी व फ्लेक्स दारोदारी यातून आमदार-खासदार होता येते, ही बाब सूर्यप्रकाशाइतकी लख्खपणे अनुभवता येत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
ताबेमारीतून हजारो गुंडागर्दी करणाऱ्या रोजगार मिळायची संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे साड्यांचे वाटप, रांगोळ्या, फुगड्या, मेहंदी अशा कार्यक्रमातून लोकप्रतिनिधी होता येते, ही बाब जनतेच्या मनावर बिंबवली जात आहे. स्वातंत्र्याच्या 77 वर्षात सुद्धा झोपडपट्ट्या वाढत चाललेले आहेत. आया-बहिणींना नालीच्या कडेला उघड्यावर आंघोळ करावी लागते, याची खंत लोकमकात्या आमदार खासदारांना नाही. गरीब दुबळ्या लोकांना संध्याकाळची भ्रांत असल्यामुळे त्यांना दीर्घ काळ आंदोलन चालविता येत नाही. भारतीय संविधानाने सर्व नागरिकांना निवाऱ्याचा मूलभूत अधिकार घोषित केलेला आहे. परंतु आज दहा बाय दहाच्या खोलीत मुला माणसांसह दहा लोकांना रहावे लागते. त्यातूनच मुलांचे चांगले शिक्षण होत नाही. त्यातच केंद्रातील तिसऱ्या आघाडीतील नेते चंद्रबाबू नायडू यांनी लोकसंख्या विस्फोटाचा बॉम्ब दिवाळीचा फटाका म्हणून दक्षिणेतील लोकांना भेट दिला आहे. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडून लोकमकात्या लोकप्रतिनिधींनी वेड्या बाभळीची शेती सुरू ठेवली असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.


लोकशाही बुकात घरकुल वंचितांची नोंद करुन, भविष्यात राज्यात स्थापन होणाऱ्या नवीन सरकारला ते बुक पाठविले जाणार आहे. या सूर्यनाम्यासाठी ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, ओम कदम, प्रकाश थोरात, जालिंदर बोरुडे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, वीरबहादूर प्रजापती, कैलास पठारे, सुधीर भद्रे, विठ्ठल सुरम आदी प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *