साकळाई जलसिंचन योजना कृती समितीसह पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार
पुढाऱ्यांनी साकळाईचे राजकारण करुन फक्त भूलथापा दिल्याचा आरोप
नगर (प्रतिनिधी)- गेली 30 वर्षे राजकीय टोलावाटोलवीत प्रलंबित असलेल्या साकळाई उपसा जलसिंचन योजना कार्यान्वीत होण्याच्या मागणीसाठी चिखली (ता. श्रीगोंदा) येथे पीपल्स हेल्पलाइन व भारतीय जनसंसदेच्या पुढाकाराने रविवारी (दि.27 ऑक्टोबर) पंचक्रोशीतील शेतकरी व ग्रामस्थ साकळाई योजनेचा सूर्यनामा करणार आहे. सकाळी 9 वाजता या आंदोलनास प्रारंभ होणार असल्याचे नुकतेच साकळाई जलसिंचन योजना कृती समितीच्या झालेल्या बैठकीत जाहीर करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
साकळाई जलसिंचन योजना कृती समितीचे अध्यक्ष बाबा महाराज झेंडे, नारायण रोडे, डॉ. योगेंद्र खाकाळ, सोमनाथ धाडगे, ज्ञानदेव भोसले, सुरेश काटे, संतोष लगड, तात्या नलगे यांनी पिपल्स हेल्पलाइनचे ॲड. कारभारी गवळी यांच्याबरोबर बैठक घेऊन सदर प्रश्नावर आंदोलन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या योजनेचे लाभार्थी हिवरेझरे, गुंडेगाव, चिखली, कोरेगाव, मांडगाव, राळेगण म्हसोबा, वडगाव, तांदळी, रुईछत्तीसी, गुणवडी, वाटेफळ, खुंटेफळ, कोयाळ, मठपिंपरी आदी गावातील शेतकरी मोठ्या संख्येने सूर्यनाम्यात सहभागी होणार आहेत.
गेली 30 वर्षे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी शेकडो पुढाऱ्यांनी साकळाई योजना नक्की करण्याच्या भूलथापा दिलेले आहेत. परंतु गेल्या दोन पिढ्यांचे नुकसान होऊन, लाभार्थी गावांना कुकडी प्रकल्पातून पिंपळगाव पिसा तलावातून साकळाई उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून पाणी मिळालेले नाही. कुकडी प्रकल्पातील सर्व धरणांचा फायदा पुणे जिल्ह्यातील सधन शेतकऱ्यांना पिढ्यान-पिढ्या होत आहे. ज्यांच्याकडे सत्ता त्यांनी सिंचन पाणी आपल्या भागासाठी वळविले. परंतु दुष्काळी भागाला कायमचे तहानलेले ठेवलेले आहे. त्यामुळे साकळाई योजना कृती समितीने शेतकरी संरक्षण कायदा होण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे. त्याचबरोबर युद्ध पातळीवर साकळाई योजना कार्यान्वीत व्हावी म्हणून सूर्यनामा केला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
या सूर्यनाम्यामुळे या भागातील मतदारसंघात वर्षानुवर्षे बिनबोभाट निवडून येणाऱ्या पुढाऱ्यांना घाम फुटला आहे. खोटे आश्वासन देऊन मतांची खैरात घेऊन पाच वर्षे निघून जाणाऱ्या पुढाऱ्यांना शेतकरी वर्ग या विधानसभेत धडा शिकवणार असल्याची भावना ॲड. गवळी यांनी व्यक्त केली आहे. या आंदोलनासाठी ॲड. गवळी, अशोक सब्बन, रईस शेख, वीरबहादूर प्रजापती, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, प्रकाश थोरात, ओम कदम आदी प्रयत्नशील आहेत.
