अनुसूचित जाती-जमातीतील आरक्षणाच्या वर्गीकरणासाठी आयोग नेमल्याचा आनंदोत्सव
विकासापासून वंचित राहिलेला वर्ग विकासाच्या प्रवाहात येण्यास मदत होणार -सुनिल शिंदे
नगर (प्रतिनिधी)- अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण होण्यासाठी शासनस्तरावर समिती गठित होऊन आयोग नेमला गेला असून, यासंदर्भात शासन निर्णय निर्गमीत झाल्याने शहरात लहुजी शक्ती सेनेच्या वतीने जल्लोष करण्यात आला. यासंदर्भात नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता. तर आयोग नेमला जाऊन समिती गठित झाल्याने मातंग समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिद्धार्थनगर येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन पेढे वाटप करुन लहुजी शक्ती सेनेने आनंदोत्सव साजरा केला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे, विजय पठारे, राजाराम काळे, अखिलेश शिंदे, कृष्णा अडागळे, मनोहर शिंदे, संतोष उमाप, किरण नगरे, संतोष शिरसाठ, आकाश जगधने, प्रविण वैरागर, सिताराम शिरसाठ, सामाजिक कार्यकर्ते सुनिल सकट, छबाबाई शिंदे, अशोक भोसले, लहू खंडागळे आदी उपस्थित होते.
जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे म्हणाले की, लहुजी शक्ती सेनेच्या वतीने विष्णूभाऊ कसबे यांच्या नेतृत्वाखाली अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणाचे वर्गीकरणाच्या मागणीसाठी अनेक राज्यव्यापी आंदोलन झाले. संघटनेच्या वतीने अनेक वर्षापासून सातत्याने ही मागणी लावून धरण्यात आली होती. आक्रमकपणे यासंदर्भात पाठपुरावा केल्याने सदर न्याय मागणीला यश आले आहे. समिती गठित झाल्याने हा प्रश्न लवकरच मार्गी लागून समाजातील वंचित घटकाला न्याय मिळण्यास मदत होणार आहे. यामुळे विकासापासून वंचित राहिलेला वर्ग विकासाच्या प्रवाहात येण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर लहूजी शक्ती सेना व मातंग समाजाच्या वतीने राज्य सरकारचे यावेळी आभार मानण्यात आले.