पटकाविली चांदीची गदा व 2 लाख रुपयांचे बक्षीस
तोडीसतोड मल्ल कुस्ती आखाड्यात भिडले
नगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केडगाव येथील श्री रेणुकामाता देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि.10 ऑक्टोबर) झालेल्या कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकासाठी झालेल्या कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील या कोल्हापूरच्या मल्लाने उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर (सोलापूर) यांच्यावर गुणांनी विजय मिळवला.
विजेता झालेल्या पै. पृथ्वीराज पाटील यांना मानाची चांदीची गदा व 2 लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले. यावेळी महादेव (अण्णा) कोतकर, पै. हर्षवर्धन कोतकर, संपत कोतकर, पै. सुदर्शन कोतकर, अंबादास गारुडकर, जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, खजिनदार पै. नाना डोंगरे, शहराध्यक्ष नामदेव लंगोटे, शहराध्यक्ष उपमहाराष्ट्र केसरी अनिल गुंजाळ, महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे, पै. वसंत पवार, लक्ष्मण सोनाळे, अमोल लंके, पोपट शिंदे, अजय अजबे, ऋषिकेश खोत, नगरसेवक संग्राम शेळके, अमोल येवले, विराज शेळके, सागर गायकवाड, गणेश बिचीतकर, सुनील (मामा) कोतकर, मनोज कोतकर, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, संभाजीराजे कदम, मनोज लोंढे, बबलू कोतकर, रमेश कोतकर, अभिजीत कोतकर, संपत कोतकर, महाराष्ट्र केसरी अभिजीत कटके, महेश गाडे, दीपक गिऱ्हे, विठ्ठल महाराज कोतकर, संग्राम केदार, संदेश शिंदे, मोहन हिरणवाळे, बाळू भापकर, संदीप डोंगरे, दादू चौगुले, सोमनाथ राऊत, संतोष पानसरे आदींसह कुस्ती क्षेत्रातील नामवंत मल्ल, वस्ताद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील विरुध्द उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर यांच्यात झालेल्या कुस्ती शेवट पर्यंत निकाली लागत नसल्याने पंचांनी कुस्ती गुणांवर घेतली. यामध्ये पै. पृथ्वीराज पाटील याने आक्रमक खेळी करुन गुणांवर विजय मिळवला.
दीड लाखाच्या बक्षीसावर पै. शुभम शिदनाळे (पुणे) विरुध्द पै. योगेश पवार (नगर) आणि 75 हजार रुपयाच्या बक्षीसावर पै. हनुमंत पुरी (पुणे) विरुध्द पै. अनिल लोणारे (पारनेर) यांच्यामध्ये झालेली कुस्ती शेवट पर्यंत रंगली होती. शेवटी गुणांवर कुस्ती घेऊन देखील तोडीसतोड भिडलेल्या मल्लांची कुस्ती बरोबरीत सुटली.
1 लाखाच्या बक्षीसासाठी पै. सुबोध पाटील विरुध्द पै. तुषार डुबे (पुणे) यांची कुस्ती प्रेक्षणीय ठरली. यामध्ये सुबोध पाटील याने तुषार डुबे याला आसमान दाखवून विजय मिळवला. तर 75 हजार रुपयाच्या पै. तुषार अरुण (नगर) विरुध्द पै. सुनिल नवले (पुणे) यांच्यात झालेल्या कुस्तीमध्ये सुनिल नवले याने आक्रमक खेळी करुन डावपेचांनी कुस्ती चितपट करुन विजय संपादन केले.

केडगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने पै. हर्षवर्धन कोतकर यांनी या कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या निकाली कुस्त्या रंगल्या होत्या. पहिल्या पाच क्रमांकासह एकूण 32 कुस्त्या विविध रकमेच्या बक्षीसांवर रात्री उशीरा पार पडल्या. तब्बल 9 लाख रुपया पर्यंतचे रोख बक्षिसे मल्लांना देण्यात आले. तोडीसतोड मल्ल कुस्ती आखाड्यात भिडले होते. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह भाविकांनी कुस्ती स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. प्रेक्षकांनी गच्च भरलेल्या मैदानात मल्लांच्या शड्डूचा आवाज घुमला. बोल बजरंग बली की जय! चा गजर करीत कुस्तीप्रेमींनी टाळ्यांच्या कडकडाटात मल्लांना दाद दिली.
पै. हर्षवर्धन कोतकर म्हणाले की, कुस्ती मल्लांना प्रोत्साहन देण्यासाठी या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. केडगावला कुस्तीचा मोठा वारसा असून, नामवंत मल्ल या मातीतून घडले आहेत. दरवर्षी नवरात्र उत्सवात कुस्ती मैदान घेतले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पै. नाना डोंगरे यांनी पै. हर्षवर्धन कोतकर व कोतकर परिवाराने कुस्ती खेळाला चालना देण्यासाठी नेहमीच उत्तम प्रकारे कुस्तीचे मैदान घेतले आहे. यामुळे नवोदित मल्लांना चालना मिळणार असून, हा खेळ वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुस्तीचे पंच म्हणून अनिल गुंजाळ, गणेश जाधव, शुभम जाधव, सोमनाथ राऊत व अजय आजबे यांनी काम पाहिले. हंगेश्वर धायगुडे यांनी कुस्तीचे उत्कृष्ट समालोचन केले.
