• Sat. Jan 31st, 2026

केडगावला श्री रेणुकामाता देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी रंगणार कुस्त्यांचा थरार

ByMirror

Oct 9, 2024

लालमातीच्या आखाड्याचे पूजन

महाराष्ट्रातील तोडीसतोड मल्ल भिडणार; 9 लाख रुपये पर्यंत बक्षीसे जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- नवरात्रोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर केडगाव येथील श्री रेणुकामाता देवीच्या यात्रेनिमित्त गुरुवारी (दि.10 ऑक्टोबर) होणाऱ्या कुस्ती मैदानासाठी लालमातीच्या आखाड्याचे पूजन करण्यात आले. केडगाव ग्रामस्थांच्या सहकार्याने पै. हर्षवर्धन कोतकर यांनी या कुस्ती मैदानाचे आयोजन केले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या निकाली कुस्त्या होणार असून, तब्बल 9 लाख रुपया पर्यंत रोख बक्षिसे मल्लांना दिले जाणार आहे. तोडीसतोड मल्ल कुस्ती आखाड्यात भिडणार आहे.


प्रारंभी हनुमानजीच्या प्रतिमेस अभिवादन करुन पैलवान दीपक कोतकर यांच्या हस्ते मैदानाचे पूजन करण्यात आले. तर कुस्ती मैदानाच्या भिंती पत्रकाचे अनावरण करण्यात आले. यावेळी पै. हर्षवर्धन कोतकर, उपमहाराष्ट्र केसरी अनिल गुंजाळ, नगर तालुका तालीम सेवा संघाचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, माजी सरपंच रावसाहेब कार्ले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक पै. वसंत पवार, पै. अंगद महानवर, उपसरपंच पै. दादू चौगुले, वस्ताद अजय आजबे, ॲड. वैभव कदम, भाऊसाहेब जाधव, सोमनाथ कराळे, रमेश कोतकर, ऋषिकेश कोतकर, दत्ता धोत्रे, दीपक गिरे, अनिकेत कोतकर, सुखदेव आरुण, दत्ता खोमणे, नवनाथ कराळे, संग्राम केदार, शुभम आजबे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, कुस्ती खेळातील नवोदित मल्लांना चालना देण्यासाठी दरवर्षी पै. हर्षवर्धन कोतकर श्री रेणुकामाता देवीच्या यात्रेनिमित्त कुस्तीचे मैदान घेत असतात. शहराला मोठी परंपरा व इतिहास असलेल्या कुस्ती खेळात अनेक नवोदित मल्ल पुढे येत आहे. या मैदानात कुस्त्यांचा थरार नगरकरांना अनुभवता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


पै. हर्षवर्धन कोतकर म्हणाले की, महाराष्ट्रातील नामवंत मल्ल या कुस्ती मैदानात उतरणार आहे. दरवर्षी कुस्तीपटूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य सातत्याने सुरु आहे. मागील वर्षी केडगावला महाराष्ट्र केसरीसाठी जिल्हा निवड चाचणी घेण्याचा दुसऱ्यांदा मान मिळाला होता. यावर्षी देखील चित्तथरारक कुस्त्यांचा अनुभव कुस्ती प्रेमींना घेता येणार आहे.
देवी रोड जवळील मैदानात गुरुवारी 3 वाजता महादेव (अण्णा) कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीला प्रारंभ होणार आहे. कुस्ती मैदानाचे उद्घाटन डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील, हिंद केसरी पै. अभिजीत कटके व उत्तर महाराष्ट्र केसरी पै. सुदर्शन कोतकर यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. यामध्ये एक नंबरची कुस्ती महाराष्ट्र केसरी पै. पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) विरुध्द उपमहाराष्ट्र केसरी पै. प्रकाश बनकर (सोलापूर) यांच्यात होणार होणार असून, यासाठी विजेत्याला 2 लाखाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. तसेच दीड लाखाच्या बक्षीसावर पै. शुभम शिदनाळे (पुणे) विरुध्द पै. योगेश पवार (नगर) व 1 लाखाच्या बक्षीसासाठी पै. सुबोध पाटील विरुध्द पै. तुषार डुबे (पुणे) यांच्यात कुस्ती होणार आहे. तर 75 हजार रुपयाच्या बक्षीसावर पै. हनुमंत पुरी (पुणे) विरुध्द पै. अनिल लोणारे (पारनेर) व पै. तुषार अरुण (नगर) विरुध्द पै. सुनिल नवले (पुणे) यांच्यासह तोडीस तोड असलेल्या मल्लांचे विविध बक्षीसाच्या रकमेवर कुस्त्या रंगणार आहेत.


या कुस्ती मैदानासाठी उत्तमप्रकारे नियोजन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षकांना बसण्यासाठी सोय करण्यात आली आहे. गुरुवारी रात्री उशीरा पर्यंत कुस्त्या चालणार असल्याने लाईटीची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. कुस्ती मैदान पाहण्यासाठी नगरकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन हर्षवर्धन कोतकर मित्र मंडळ व केडगाव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *