• Wed. Jul 2nd, 2025

आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये मोफत दंतरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ByMirror

Sep 29, 2024

आनंदऋषीजी हॉस्पिटलचे शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहचविण्याचे कार्य दिशादर्शक -फुलचंद बाठीया

120 रुग्णांची मोफत दंत तपासणी व अल्पदरात होणार उपचार

अहमदनगर (प्रतिनिधी)- आनंदऋषीजी हॉस्पिटलची आरोग्यसेवा रुग्णांसाठी संजीवनी ठरत आहे. सर्वसामान्य घटकांना याचा लाभ मिळत असून, सेवाभाववृत्तीने कार्य सुरु आहे. आरोग्य सुविधा घराघरात पोहचविण्याचे कार्य व आरोग्याबद्दल समाजात जागृती निर्माण करण्याचेही कार्य हॉस्पिटलच्या माध्यमातून होत आहे. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवेचा लाभ पोहचवून माणुसकीच्या भावनेने उभे राहिलेले दिशादर्शक कार्य समाजासाठी प्रेरणादायी असल्याची भावना पुणे येथील उद्योजक फुलचंद बाठीया यांनी केले.


जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मोफत दंतरोग तपासणी व उपचार शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी फुलचंद बाठीया बोलत होते. याप्रसंगी चंचलाताई बाठीया, चंद्रकांत भंडारी, संतोष बोथरा, सतीश (बाबूशेठ) लोढा, मानकचंद कटारिया, डॉ. आशिष भंडारी, सुमित लोढा, वसंत चोपडा, डॉ. अर्पणा पवार, डॉ. प्राची गांधी, डॉ. स्वराज ठोले, डॉ. प्रणव डुंगरवाल, डॉ. तृप्ती डुंगरवाल, डॉ. कोमल ठाणगे, डॉ. अश्‍विनी पवार आदी उपस्थित होते.


प्रास्ताविकात संतोष बोथरा म्हणाले की, शासकीय योजनेत दातांचे विकार बसत नसल्याने महागडे उपचार सर्वसामान्यांना परवडत नाही. यासाठी आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये डेंटल विभागच्या माध्यमातून ना नफा, ना तोटा या तत्त्वावर आरोग्य सुविधा दिल्या जात आहे. मागील 25 वर्षापासून सातत्याने विविध आरोग्य सेवा देण्यासाठी हॉस्पिटल कटीबद्ध असून, सर्व अद्यावत आरोग्य सेवा एका छताखाली आणली जात आहे. पैसा महत्त्वाचा नसून, सेवाभाव महत्वाचा आहे. हे शिबिर नसून, आरोग्य सेवेचे मिशन सुरू आहे. या दृष्टीकोनाने शेवटच्या घटकांपर्यंत सेवा पोहचविण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तर आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या आरोग्यसेवा कार्यात बाठीया परिवाराचे नेहमीच योगदान मिळाले असून, पुण्यातून त्यांनी मोठी मदत हॉस्पिटलसाठी उपलब्ध करुन दिली. चंद्रकांत भंडारी यांचे हॉस्पिटलच्या स्थापनेपासून योगदान मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.


चंद्रकांत भंडारी म्हणाले की, आरोग्यसेवा महत्त्वाची असून, पैसा हा दुय्यम आहे. पैश्‍याअभावी उपचार थांबू नये, या प्रामाणिक हेतूने हॉस्पिटलचे कार्य सुरु आहे. मानवसेवेच्या भावनेने लावण्यात आलेल्या आरोग्य सेवेच्या रोपाचे वटवृक्ष बहरले असून, अनेकांना त्याखाली सावली मिळत आहे. आरोग्याची गंगा शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम या हॉस्पिटलच्या माध्यमातून सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. प्राची गांधी यांनी दात सफाई करण्याबरोबर मौखिक कॅन्सर पर्यंत सर्व सुविधा व उपचार हॉस्पिटलच्या दंत विभागात उपलब्ध आहेत. सुपर स्पेशालिटी तज्ञ डॉक्टरांची टीम सेवेसाठी सज्ज आहे. अत्यल्प दरात रुग्णांना दंत व जबड्यासंबंधी सर्व उपचार पध्दतीची सेवा मिळत आहे. दर शनिवारी दंत रोग विभागाची ओपीडीची मोफत व इतर वेळेस सवलत दिली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.


दंतरोग तपासणी शिबिरात 120 रुग्णांची मोफत दंत तपासणी करण्यात आली. दंतरोग तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची दंत तपासणी करुन त्यांना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये मेटलकॅप, सिरॅमिक कॅप, रुट कॅनल, दातांची कवळी बसविणे, दात साफ करणे व दातांमध्ये सिमेंट भरणे आदी उपचार अल्पदरात उपचार करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आशिष भंडारी यांनी केले. आभार सतीश (बाबूशेठ) लोढा यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *