• Wed. Nov 5th, 2025

विधानसभेत लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती करणाऱ्यांना उमेदवारी जाहीर करावी

ByMirror

Sep 21, 2024

निसर्ग श्रीमंत भारत घडविण्याचा संकल्प घेण्याचा आग्रह

पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेचा पुढाकार

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सार्वजनिक विधानसभा निवडणुकीत जनतेनेच पुढाकार घेऊन लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती करणाऱ्या व्यक्तींना उमेदवारी जाहीर करण्याचे आवाहन पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या वतीने करण्यात आले आहे. तर ग्लोबल वार्मिंगचा प्रश्‍न सोडविण्यासाठी रेनगेन बॅटरी आणि ग्रीनगेन बॅटरी तंत्राचा अवलंब करुन निसर्ग श्रीमंत भारत घडविण्याचा संकल्प घेण्याचा आग्रह धरला आहे.


मराठवाड्याच्या जालनासह इतर जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती असते, परंतु डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी नव्या जलसंधारण तंत्राचा वापर करून या भागात क्रांतीचे बीज पेरले आहे. पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेने रेनगेन बॅटरी आणि ग्रीनगेन बॅटरी तंत्राचा आग्रह धरला त्याच तंत्राशी सुसंगत डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी जलतारा प्रकल्प वापरला. त्यातून जिरायतदार शेतकरी हंगामी बागायतदार होऊ शकले. त्यामुळे देशातील दख्खनच्या पठारावर लाखो हेक्टरवरील जिरायत जमिनींचे रुपांतर हंगामी बागायतदार जमिनींमध्ये करण्याची क्षमता निर्माण झालेली आहे.


पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेने लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्तीवर आधारित भारतीय लोकशाहीचे उन्नतीकरण करण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्यातून लोकभज्ञाक भारत निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्‍न गंभीर होण्याला सिमेंटचे जंगले कारणीभूत आहे. त्याचबरोबर वनसंपदा आणि जैवविविधता लोप पावत आहे. त्यामुळे ग्लोबल वार्मिंगचा प्रश्‍न अधिक गंभीर होत आहे. कोणत्याही सरकारच्या प्रयत्नांला व्यापक जनसहभागामुळेच यश येऊ शकते, त्यामुळे तमाम जनतेसह सरकारने सुद्धा रेनगेन बॅटरी आणि ग्रीनगेन बॅटरी राबविणे आवश्‍यक आहे. रेनगेन बॅटरीमध्ये पावसाचे पाणी भूमिगत साठ्यांमध्ये करण्याचे सोपे तंत्र आहे. त्यासाठी दख्खनच्या पठारावर सहजासहजी उपलब्ध होणारे दगडगोटे अल्पपैशात उपलब्ध होऊ शकतात आणी त्यातून शेतजमिनींमध्ये किंवा झाडांच्या शेजारी खोदलेल्या खड्ड्यांमध्ये तेच दगडगोटे टाकून पावसाचे गाळमुक्त पाणी अशा खड्ड्यांमध्ये नैसर्गिक रितीने जाण्याची व्यवस्था केली तर खालच्या मुरूमातून त्या परिसरातील झाडांना व बागेला वर्षभर पुरेशी ओल टिकून राहते. बोरवेल आणि विहीरींना देखील मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते. सुर्याचा प्रकाश आणि पावसाचे पाणी यातून निसर्ग श्रीमंत भारत करणे सहज शक्य आहे.


डॉ. पुरूषोत्तम वायाळ यांनी पीपल्स हेल्पलाईन आणि भारतीय जनसंसदेच्या कार्यकर्त्यांबरोबर केंद्रीय परिवहन मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे देशव्यापी सदाहरित रस्ते निर्मीतीसाठी या तंत्रचा अवलंब करण्याची मागणी केली आहे. देशभर सत्तापेंढारी, ताबामारी, सत्तामारी, टक्केवारी, मारामारी आणि मतमारी या प्रयोगामध्ये गुंतले आहेत. अशा वेळी डॉ. पुरूषोत्तम वायाळ यांच्यासारखे अनेक उमेदवार जनतेने पुढे आणले पाहिजे. येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षांनी लोकभक्ती, ज्ञानभक्ती आणि कर्मभक्ती यशस्वी केलेल्या व्यक्तीलाच उमेदवारी द्यावी असे कळकळीचे आवाहन या संघटनांनी केले आहे. यासाठी ॲड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, प्रकाश थोरात, ओम कदम, शाहीर कान्हू सुंबे, वीर बहादूर प्रजापती, विठ्ठल सुरम, अशोक भोसले आदींसह कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *