पतीसह तिच्या प्रेयसीविरुद्ध गुन्हा दाखल
सासरच्या कुटुंबीयांकडून पैश्यासाठी छळ, तर नवऱ्याच्या प्रेयसीकडूनही दिल्या जायच्या धमक्या
अहमदनगर (प्रतिनिधी)- नवऱ्याचे एका महिलेशी असलेले प्रेमसंबंध, त्यातून तिला नवऱ्यासह त्याच्या प्रेयसीकडून दिला जाणारा त्रास, सासू- सासऱ्यांकडून माहेराहून पैसे आणण्यासाठी होणारा छळ या सर्वांना कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. नवनागापूरच्या चेतना कॉलनीत ही घटना घडली असून, तेजल संग्राम भापकर (वय 24, रा. चेतना कॉलनी, नवनागापूर) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नवरा, सासू, सासरे व नवऱ्याची प्रेयसी अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मृत तेजलचे वडील पाटीलवा मारुती थेटे (रा. कोल्हार भगवतीपूर, ता. राहाता) यांनी फिर्याद दिली आहे. मृत तेजल हिचा विवाह दि. 19 डिसेंबर 2021 रोजी संग्राम विठ्ठल भापकर याच्याशी झाला होता. मात्र, संग्रामचे लग्नापूर्वीपासून शेजारच्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. लग्न झाल्यावरही ते सुरूच होते. याची माहिती तेजलला समजल्यावर तिने विचारणा केली असता संग्रामने तिला मारहाण करत त्रास द्यायला सुरुवात केली. तसेच तिला माहेराहून पैसे आणण्यास सांगू लागला. एकदा तिने माहेराहून 1 लाख रुपये आणूनही दिले होते. मात्र, त्याची मागणी वारंवार होऊ लागली. तिला होणाऱ्या त्रासाबाबत तिने तिच्या माहेरी सांगितलेही होते.
सन 2023 च्या सुरुवातीला नवऱ्याच्या बाहेरील प्रेमसंबंधांवरून दोघांमध्ये जोरदार वाद झाले. त्यामुळे तिने स्वतः हातावर ब्लेडने वार करून घेतले होते. त्या वेळी दवाखान्यात उपचार घेतल्यानंतर 15 दिवस ती माहेरी राहिली. त्या वेळी सासू संगीता, सासरे विठ्ठल भापकर व त्यांचे आणखी एक नातेवाईक तिच्या माहेरी गेले. यापुढे असे होणार नाही असे सांगत तिला सासरी घेऊन आले. मात्र, संग्रामच्या वागण्यात काहीही फरक पडला नाही. उलट ती महिलाही तेजलला त्रास देऊ लागली. सासू, सासरे मात्र त्यांच्या मुलाचीच बाजू घेत तेजलशीच वाद घालून तिला त्रास देत होते. या सर्वांच्या त्रासाला कंटाळून अखेर तेजलने बुधवार 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली.
याबाबत प्रारंभी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, गुरुवार (दि.12 सप्टेंबर) रोजी रात्री मृत तेजलचे वडील पाटीलवा मारुती थेटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी नवरा संग्राम भापकर, सासू संगीता भापकर, सासरा पोपट भापकर आणि नवऱ्याची प्रेयसी अशा चौघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.