ग्रामीण भागातील विद्यार्थी होणार संगणक साक्षर
अहमदनगर (प्रतिनिधी)- समग्र शिक्षा अंतर्गत राज्यातील 2273 शाळेमध्ये संगणक प्रयोगशाळा स्थापित झाल्या असून, अहमदनगर जिल्ह्यातील 44 शाळांमध्ये हा उपक्रम राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद (मुंबई) श्रीमती आर. विमला यांच्या सूचनेप्रमाणे व अहमदनगर जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने राबविण्यात आले आहे.
सध्याच्या युगात संगणकाचा उपयोग हा विद्यार्थ्यांना फार महत्त्वाचा मानला जात असून, आज प्रत्येक ठिकाणी संगणकाशिवाय पर्याय नाही. विद्यार्थ्यांना संगणक कशा पद्धतीने चालवयाचे? यासाठी समग्र शिक्षा अंतर्गत प्रत्येक शाळेमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. यामध्ये गाव पातळीवरील शाळाही मागे नाही. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा व्हावा असाही प्रयत्न महाराष्ट्र शासनाने पूर्णपणे केला आहे.
प्रत्येक शाळेमध्ये या संगणक प्रयोग शाळेसाठी एक शिक्षकाची सुद्धा नेमणूक करण्यात आलेले आहे. आधुनिक काळात टिकायचे असेल तर संगणकाशी मैत्री करावी लागेल व ते शिकावेपण लागेल! हे उद्दिष्ट समोर ठेवून हा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. याचा संपूर्ण फायदा गाव पातळीवरील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निश्चित फायदा होईल अशी अपेक्षा प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांनी व्यक्त केली आहे.
