शिक्षण उपसंचालकांसह शिक्षण विभागाचे अधिकारी राहणार हजर
मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर तसेच क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-जामखेड रोडवरील तक्षिला विद्यालयाचा कार्तिक लवलेकर या विद्यार्थ्याने शासनाच्या राष्ट्रीय पातळीवर सादर झालेल्या प्रेरणा एक अनुभवात्मक ज्ञान या कार्यक्रमात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले. त्याने गुजरात येथील वडनगर येथे सहा दिवसीय कार्यशाळा यशस्वी पार पाडल्याबद्दल शाळेच्या प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांनी त्याचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रेरणा एक अनुभवात्मक ज्ञान हा शासकीय कार्यक्रम असून, यामध्ये संपूर्ण भारतातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन विद्यार्थ्यांची निवड करुन त्यांना जिल्ह्यासह राज्यातील संस्कृतीची माहिती द्यायची असते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश नव्या पिढीला 2047 पर्यंत विकसित भारत बनविणे हा आहे. या उपक्रमातून युवकांमध्ये भारताची समृद्ध संस्कृती आणि वारसाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचा उपक्रम शासनाने राबविला आहे.
इयत्ता बारावीत असलेल्या कार्तिक लवलेकर याने या कार्यक्रमात विकसित भारताचे चित्र रेखाटून उच्चस्तरीय पॅनलच्या मुलाखतीत उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्याची गुजरात येथील वडनगर येथे आयोजित सहा दिवसीय कार्यशाळेसाठी निवड करण्यात आली होती. कार्तिकने महाराष्ट्राची परंपरा कला याची ओळख व्हावी, यासाठी सर्वांसमोर पुरणपोळी, वारली पेंटिंग व छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा गात महाराष्ट्राच्या संस्कृतीचा झेंडा फडकवला. तर आपला भारत देश युवकांच्या माध्यमातून भविष्यातील विकसित विश्वगुरु होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली.
कार्तिकने सहा दिवसीय कार्यशाळेत अनेक ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन गुजरातच्या संस्कृतीची माहिती घेतली. तेथील वास्तूकला, शिल्पकला याबद्दल जाणून घेतले. तर शहरात परतल्यावर शालेय विद्यार्थ्यांना तेथील संस्कृतीची माहिती दिली. प्राचार्या जयश्री मेहेत्रे यांनी कार्तिकचे अभिनंदन करुन त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कौतुक केले. तर यशाची शिखरे सर करताना सर्वात जास्त आनंद त्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकाला होत असल्याचे सांगून, इतर मुलांनीही नवनवीन उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
