जन शिक्षण संस्थेत शिक्षक दिन साजरा
समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान हा एकप्रकारे समाजाचा सन्मान -प्राचार्य सुनील सुसरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन आत्मनिर्भर बनविणाऱ्या जन शिक्षण संस्थेत शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.
जन शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापकीय कमिटीचे व्हाईस चेअरमन तथा उद्योजक विजय इंगळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाई सथ्था नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे, जन शिक्षण संस्थेचे संचालक बाळासाहेब पवार, सल्लागार समिती सदस्या कमल पवार, कार्यक्रम अधिकारी शफाकत सय्यद, कुंदा शिंदे, लेखापाल अनिल तांदळे आदींसह प्रशिक्षणार्थी महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रारंभी सावित्रीबाई फुले व डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते ममता गड्डम, मंगल चौधरी, माधुरी घाटविसावे, संध्या म्हस्के, वंदना चव्हाण, प्रिया नराल, नाजिया शेख, स्नेहल गीते या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात बाळासाहेब पवार म्हणाले की, देशाच्या प्रगतीमय वाटचालीत शिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. गुरुशिवाय जीवनाला अर्थ नाही. गुरुंप्रती आदर व निष्ठा असणारे शिष्य जीवनात यशस्वी होतात. शिक्षक समाज घडवून दिशा देण्याचे कार्य करतात. जन शिक्षण संस्थेतील प्रशिक्षिका महिला व युवतींना पायावर उभे करण्याचे काम करत असल्याचे स्पष्ट केले.
प्राचार्य सुनील सुसरे म्हणाले की, प्रत्येक व्यक्ती हा विद्यार्थी असतो. त्याला घडविण्याचे काम शिक्षक करतात. फक्त शिक्षण देणारेच शिक्षक नसून, समाजात योग्य मार्गदर्शन करुन दिशा देणारे देखील शिक्षकच आहे. प्रत्येकाच्या जीवनात शिक्षकाला महत्त्व आहे. समाज घडविणाऱ्या शिक्षकांचा सन्मान हा एकप्रकारे समाजाचा सन्मान असल्याचे त्यांनी सांगितले.
विजय इंगळे म्हणाले की, शिक्षक राष्ट्र उभारणीचे काम करतात. चार भिंतीत शिक्षकांचे काम असले तरी, ते समाज घडवितात. सध्या ज्ञान सर्वत्र उपलब्ध असून, मूल्य रुजवून माणूस म्हणून घडविण्याचे महत्त्वाचे काम शिक्षक करत आहे. त्यांच्या या कार्यामुळे सशक्त राष्ट्र उभारणी होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. कमल पवार यांनी शिक्षकांचा सन्मान होणे गरजेचे आहे. प्रत्येकाला जीवनात उभे राहण्याचे सामर्थ्य व बळ शिक्षकांमुळे मिळाले असल्याचे सांगून, त्यांनी नेहमीच शिक्षकांपुढे नतमस्तक होण्याचे आवाहन केले.
