शालेय शिक्षकांचा सन्मान
चक्रधर स्वामी जयंती व मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी)- अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक ज्ञानाचे बीज विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात व त्यांचा अनमोल ठेवा आत्मसात करून त्यांचे रूपांतर मोठ्या वृक्षांमध्ये होत, असल्याचा संदेश कार्यक्रमातून देण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. महानुभव पंथाचे संस्थापक चक्रधर स्वामी यांची जयंती व जगाला शांततेचा संदेश देणारी मदर तेरेसा यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे प्राचार्य प्रभाकर भाबड, उपप्राचार्या कविता सुरतवाला, पूर्व प्राथमिक विभागाचे प्रमुख कुमार, प्राथमिक विभाग प्रमुख रेखा शर्मा, माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख अश्विनी रायजादे उपस्थित होते.
शिक्षक दिनानिमित्त इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका पार पाडून वर्गात अध्यापनाचे कार्य केले. शाळेत विद्यार्थ्यांच्या वतीने शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल माध्यमिक विभागाचे रवींद्र उजागरे व प्राथमिक विभागप्रमुख रेखा शर्मा यांचा सत्कार करण्यात आला.
शाळेचे प्राचार्य प्रभाकर भाबड यांनी उज्वल भवितव्य घडविण्यासाठी शिक्षकांचे मोठे योगदान असल्याचे सांगून, आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षक दिनाचे व शिक्षकांचे महत्त्व पटवून सांगितले. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया व सहकार्यवाह गौरव फिरोदिया यांनी शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
शिक्षकांच्या सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन इयत्ता दहावीची विद्यार्थिनी गार्गी जोशी हिने केले. तिला देवयानी साळुंके व नित्यश्री साळुंके या विद्यार्थिनींनी तिला मदत केली. सत्कार समारंभाप्रसंगी शाळेच्या विद्यार्थी प्रमुख आर्यन दुबे पाटील, विद्यार्थिनी प्रमुख शालमली तरावडे, विद्यार्थी उपप्रमुख कृष्णा पोपटानी व अवनी पाटील आदी उपस्थित होते.
