समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांचे विचार नव्या पिढीला देण्याची गरज -दादाभाऊ कळमकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजाला दिशा देणाऱ्या महापुरुषांचे विचार नव्या पिढीला देण्याची गरज आहे. महापुरुषांचे महान कार्य पुस्तकात बंद न राहता ते समाजात पेरले गेल्यास सशक्त समाज घडणार आहे. प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांचा इतिहास समाजापुढे आणून त्यांच्या विचार व कार्यातून प्रेरणा देण्याचे काम केले असल्याचे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य दादाभाऊ कळमकर यांनी केले.
भिंगार येथील रयत शिक्षण संस्थेचे श्रीमती ॲबट मायादेवी गुरुदित्ताशाह हायस्कूल, ज्यूनियर आर्ट्स कॉलेज व विश्वशंकर प्राथमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रा. रतनलाल सोनग्रा लिखित विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या साहित्य कृतीचा कार्य गौरव शिलाचे लोकार्पण व जनता आवृत्तीचे प्रकाशन पार पडले. यावेळी कळमकर बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक रतनलाल सोनग्रा, अरुण आहिर, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ज्ञानदेव पांडुळे, विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे, प्राचार्य प्रमोद तोरणे, पर्यवेक्षक संपत मुठे, शिवाजीराव भोर, कैलास मोहिते, नरेंद्र गोयल, अरुणाताई गोयल, सुशीलाताई सोनाग्रा, प्रेमसुख सोनाग्रा आदींसह सर्व शालेय शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना कळमकर म्हणाले की, स्त्रियांना घरा बाहेर पडून शिक्षण घेणे त्याकाळी पाप मानले जायचे. मात्र महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी समाज व्यवस्थेच्या विरोधाला झुगारुन शैक्षणिक क्रांती घडवली. त्यांनी केलेल्या स्त्री शिक्षणाच्या कार्यामुळे समाजाची प्रगती झाली. आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पाहुण्यांचे स्वागत अरुण आहिर यांनी केले. प्रास्ताविकात प्रमोद तोरणे यांनी प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी विठ्ठल रामजी शिंदे यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांची माहिती देऊन कार्यक्रमाचा स्वरुप विशद केला. रतनलाल सोनग्रा यांनी विद्यालयासाठी एक लाख रुपयाची आर्थिक मदत दिली.
सोनग्रा म्हणाले की, महर्षि विठ्ठल रामजी शिंदे यांनी समाजाला दिशा देण्यासाठी केलेले कार्य दिशादर्शक आहे. त्यांचे योगदान व कार्य समाजापुढे जाण्याची गरज आहे. त्यांच्या जीवन कार्याची समाजाला माहिती व्हावी व त्यापासून प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणाऱ्या साहित्य कृतीचा कार्य गौरव शिला लावण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधव रेवगडे आणि आकांक्षा पडदुणे यांनी केले. आभार एन.एम. अनभुले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शालेय शिक्षक व शिक्षकेतरांनी परिश्रम घेतले.