मुस्लिम समाजाला धमकी देणारे भाषण करुन दोन समाजात जातीय तेढ निर्माण केल्याचा आरोप
वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- भाजपचे आमदार नितेश राणे यांनी अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाला धमकी देणारे भाषण करुन दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने चिथावणी दिल्याप्रकरणी त्यांच्यावर व सभेच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्ष राकेश ओला यांची भेट घेऊन निवेदन दिले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, शहर जिल्हा महासचिव अमर निरभवणे, शहर उपाध्यक्ष अजीम शेख, उपाध्यक्ष प्रवीण ओरे, मनोहर जिंदम, सिसिल भक्त, आबेद शेख, अक्षय शिंदे, जोसेफ शिरसाट, राजू भिंगारदिवे, बबलू मकासरे, सुरेश पानपाटील, संजय शिंदे, मुजाहिद शेख, साहिल शेख, सिद्धार्थ पवार, पिनू भोसले आदी उपस्थित होते.

शहरात महंत रामगिरी महाराज यांना समर्थन देण्यासाठी शहरातून रविवारी (दि.1 सप्टेंबर) आमदार नितेश राणे यांनी शहरातून रॅली काढून दिल्लीगेट येथे सभा घेतली. या सभेत त्यांनी मुस्लिम समाजाला मशिदीत घुसून मारण्याच्या धमक्या देणारे वक्तव्य केले. त्यांच्या भाषणाने संपूर्ण मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाबद्दल नेहमी चिथावणीखोर भाषण करुन धार्मिक द्वेष पसरविण्याचे काम ते करत आहे. संविधान व लोकशाहीवर घाला घालण्याचे काम ते सातत्याने करत असून, भडकाऊ भाषणाने शहरातील जातीय सलोबा बिघडविण्याचे काम करत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
याप्रकरणी नितेश राणे व आयोजकांवर गुन्हे दाखल करुन कठोर कारवाई करावी व यापुढे समाजात जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने सभा अथवा मोर्चे काढणाऱ्यांना परवानगी देऊ नये, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.