दंडाची रक्कम वसूल न करता शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई व्हावी
अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा
अहमदनगर (प्रतिनिधी)- अनाधिकृत गौण खनिज साठा प्रकरणी सुलतानपूर (ता. पारनेर) येथे पंचनामा करून दंडात्मक कारवाईच्या नोटीस प्रकरणात सदर प्रकरण दाबून ठेवण्याच्या उद्देशाने ही रक्कम वसूल न करता शासनाची दिशाभूल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने करण्यात आली आहे. नोटीसावर असलेल्या सह्यांच्या गौडबंगालसाठी चौकशीचीही मागणी पारनेर तहसिलदार यांच्याकडे करण्यात आली असून, याप्रकरणी येत्या पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अरुण रोडे व पारनेर तालुका अध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी दिला आहे.
म्हसणे तलाठी (ता. पारनेर) यांनी 13 एप्रिल रोजी पंचनामा करून अधिकृतरित्या गौणखनिज साठा केल्याने दत्तात्रय शिवाजी दिवटे व इतर तीन यांना तहसील कार्यालय पारनेर यांच्याकडून नोटीस बजावण्यात आली आहे. नोटिसावरती जबाबदार अधिकारी तहसीलदार यांची स्वाक्षरी नसून, या प्रकरणात तहसीलच्या अधिकाऱ्याने नोटीस धारकांसंगे आर्थिक हितसंबंध ठेऊन हे प्रकरण संगणमत करून दाबून ठेवला आहे.
या प्रकरणाची दंडात्मक रक्कम 72 लाख 45 हजार इतकी दाखविण्यात आली असून, ही रक्कम जाणीवपूर्वक अधिकाऱ्यांनी वसूल न करता स्वत:चा हित साधून शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडविला आहे. त्यामुळे यामध्ये असणारे सर्व जबाबदार अधिकारी हे दोषी असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
या प्रकरणी शासनाची दिशाभूल करून शासकीय रक्कम वसूल करण्यास दिरंगाई करण्यात आली आहे. तहसील कार्यालयाच्या दोन वेगवेगळ्या नोटीसवर तहसीलदार पारनेर यांच्या सह्या दिसून येत आहेत. या सर्व नोटीसची चौकशी करून जबाबदार असणाऱ्या अधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. सुलतानपूर भागामध्ये इतर गटामध्ये पंचनामे झाले असून, त्याबाबत कुठल्याही प्रकारची नोटीस आज अखेर देण्यात आलेली नाही. 19 जून रोजी काढण्यात आलेली नोटीसची शहानिशा वरिष्ठ कार्यालयातून करण्याचे निवेदनात म्हंटले आहे.