• Wed. Jul 2nd, 2025

दिव्यांग महिलेची शेत जमीन बळकाविण्यासाठी पिकांवर तणनाशकची फवारणी

ByMirror

Sep 2, 2024

संबंधितांवर दिव्यांग अधिनियम कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी

जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन

अहमदनगर (प्रतिनिधी)- शेत जमिनीचा वाद न्यायप्रविष्ट असताना शेतजमीनीत बेकायदेशीर प्रवेश करून पिकांवर तणनाशकची फवारणी करुन पिकांची नासधूस करणाऱ्यांवर कारवाईची मागणी अस्थीव्यंग दिव्यांग महिला हिराबाई जालिंदर लाटे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर दिव्यांग असल्याने जाणीवपूर्वक धमकावून जमीन बळकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर दिव्यांग अधिनियम कायदा 2016 अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून ॲट्रॉसिटीचे कलम लावण्याची मागणी दिव्यांग महिलेने केली आहे.


हिराबाई जालिंदर लाटे या अस्थिव्यंग दिव्यांग असून, त्यांचे मौजे टाकळी लोणार (ता. श्रीगोंदा) येथे चार एकर शेत जमीन आहे. त्या पतीसह शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. शेतजमीन लगत असलेले भांडवलकर कुटुंबीयांचा आणि त्यांचा शेतजमिनीचा वाद न्यायप्रविष्ट आहे. मात्र भांडवलकर कुटुंबीय वेळोवेळी शेतात जाण्यास मज्जाव करुन पिकांची नासधूस करत आहे. तर जमीन बळकाविण्याच्या उद्देशाने दहशत निर्माण करत असल्याचा आरोप लाटे यांनी केला आहे.


भांडवलकर कुटुंबीयांकडून जीवे मारण्याची धमकी व शेती बळकवण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. सदर प्रकरणी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला तक्रार देऊनही अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कारवाई करत नसल्याने दिवसेंदिवस त्यांचे धाडस वाढत आहे.

16 ऑगस्ट रोजी शेतात बेकायदेशीर प्रवेश करून उभ्या पिकांवर तणनाशकाची फवारणी करून पिकांचे पूर्णपणे नुकसान करण्यात आले आहे. त्याबाबत जाब विचारला असता, त्यांच्याकडून जीवे मारण्याची धमकी दिली जात असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या प्रकरणी संबंधीतांवर कारवाई करुन न्याय मिळण्याची मागणी दिव्यांग महिला लाटे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *