• Fri. Mar 14th, 2025

सावधान! नोकरीचे आमिष दाखवून तो व्यक्ती करतोय विद्यार्थी व पालकांची फसवणूक

ByMirror

Sep 1, 2024

एमआयआरसीत नोकरीचे आमिष दाखवून पैसे उकळणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल व्हावा

अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयआरसी मध्ये क्लार्क पदावर नोकरी लावण्यासाठी 3 लाख रुपये घेऊन फसवणुक केल्याप्रकरणी वैद्य कॉलनी जामखेड रोड येथे राहत असलेल्या व आर्मड क्रॉप सेंटर ॲण्ड स्कूल मध्ये कार्यरत असलेल्या त्या व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी फळ विक्रेते मुश्‍ताक तांबोळी यांनी केली आहे. यापूर्वी देखील त्या व्यक्तीवर भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, सुशिक्षित बेरोजगार युवकांना लष्कराच्या विविध विभागात नोकरीचे अमिष दाखवून सदर व्यक्ती फसवणुक करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.


शहरातील झेंडीगेट येथे राहणारे मुश्‍ताक तांबोळी यांचा जामखेड रोड येथे स्टेट बँक चौकात फळांचा व्यवसाय आहे. त्यांची आर्मड क्रॉप सेंटर ॲण्ड स्कूल मध्ये कार्यरत असलेल्या त्या व्यक्तीशी ओळख होती. लष्काराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चांगले संबध असल्याने विविध विभागात पैसे घेऊन नोकरीवर लावून देत असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले. तर सदर व्यक्तीने 7 लाख रुपयाच्या बोलणीवर तांबोळी यांच्या मुलाला एमआयाआरसी मध्ये क्लार्क पदावर लावून देण्याचे आश्‍वासन दिले.

त्या व्यक्तीने अर्ज आणून मुलाचा फॉर्म भरुन घेतल्याने त्याच्यावर तांबोळी कुटुंबीयांचा विश्‍वास वाढला. त्यापोटी त्या व्यक्तीला वेळोवेळी अशी एकूण 3 लाख रुपये देण्यात आले. पुढे कोणताही कार्यवाही होत नसल्याने त्याला सातत्याने विचारणा केली असता, सदर व्यक्ती उडवाउडवीचे उत्तरे देऊ लागला. चार ते पाच वर्षे त्याने टाळले त्याच्यावर संशय आल्याने त्याची माहिती घेतल्यानंतर सदर व्यक्तीवर भिंगार पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. यामुळे सदर व्यक्तीने फसवणुक केली असल्याचे समजले असल्याचे निवेदनात तांबोळी यांनी म्हंटले आहे.


आर्मड क्रॉप सेंटर ॲण्ड स्कूल मध्ये कार्यरत असलेला हा व्यक्ती अनेक युवक व पालकांना लष्कराच्या विविध विभागात नोकरी लावून देण्याचे अमिष दाखवून पैसे उकळत आहे. सदर व्यक्तीने नोकरीचे आमिष दाखवून लुबाडल्याप्रकरणी त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मुश्‍ताक तांबोळी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *