संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथील विद्या प्रतिष्ठान संचलित डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान आणि सरस्वती प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्या मंदिर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. तर संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास डॉ. श्रीकृष्ण जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीवर भाषणे, गीत, समूहगीत सादर केले. तर विविध धाडसी प्रात्यक्षिके सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. राज्यस्तरीय मंथन प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
भारताचे जागरूक नागरिक म्हणून आपली कर्तव्ये आणि अधिकार याचे महत्त्व रंजक गोष्टींमधून विद्यार्थी आणि पालकांना पटवून देण्यात आले. तर उपस्थित पालकांना मतदान जनजागृती मोहिमेतंर्गत मतदानाचा हक्क बजावण्याची शपथ देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष दादाराम ढवान, सहकार्यावाह मुरलीधर पवार, प्राचार्य रवींद्र चोभे, पालक प्रतिनिधी कातखडे, मार्गदर्शिका कारले मॅडम, मुख्याध्यापक संदीप भोर, मुख्याध्यापिका सौ. धर्माधिकारी आदींसह सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
