राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शिष्टमंडळाने वेधले विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष
लोंबकळणाऱ्या वायरी व उघड्या डिपीमुळे नागरिकांचे जीव धोक्यात; उपाययोजना करण्याची मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- विद्युत महावितरणच्या दुर्लक्षामुळे मुकुंदनगर भागात धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली असताना, या भागात विद्युत पुरवठा करणारी लोंबकळणारी मुख्य लाईनची (हायटेन्शन) वायर ओढून घेऊन त्याला उंची द्यावी व उघड्या असलेल्या डिपीला बंदिस्त करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या शिष्टमंडळाने विद्युत महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुजाता एस. नगराळे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

मुकुंदनगरच्या गंभीर प्रश्नाबाबत शिष्टमंडळाने त्यांचे लक्ष वेधून तातडीने उपाययोजना करण्याचा आग्रह धरला. यावेळी अतिरिक्त कार्यकारी अभियंता नगराळे यांनी मुकुंदनगर भागात नियुक्त असलेल्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांशी तातडीने संपर्क साधून लोंबकळणाऱ्या वायरीची उंची वाढविण्यासंदर्भात व कमी उंचीचे पोल बदलण्या संदर्भात सूचना केल्या. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, खालिद शेख, समीर खान, मोहसीन शेख, नवेद शेख, टिपू भाई, शहेबाज बॉक्सर, शाहनवाज शेख, सोनू शेख, जावेद राजे, तंजीम शेख, भैय्या पठाण, अकदस शेख, शहेबाज मिर्झा, अरबाज शेख, फिरोज पठाण आदींसह मुकुंदनगर भागातील नागरिक उपस्थित होते.
मुकुंदनगर भागातील नागरिकांचा जीव विद्युत पुरवठा करणारी लोंबकळणारी मुख्य लाईनची (हायटेन्शन) वायर व उघड्या असलेल्या डिपीमुळे धोक्यात आला आहे. विद्युत महावितरणचे या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मुख्य लाईनची (हायटेन्शन) वायर मुकुंदनगर भागातील फकीर वाडा रहेमानिया कॉलनी, दम बारा हजारी दर्गा परिसर, समीर नगर, गौरव नगर, वाबळे कॉलनी, तमिमदारी मस्जिद परिसर, पठाण कॉलनी, एकता कॉलनी, गोविंदपुरा,आयेशा मस्जिद परिसर, नवेद कॉम्प्लेक्स, इनाम मस्जिद, नवीन मुकुंद नगर, बडी मरियम मस्जिद परिसर, गरीब नवाझ मस्जिद परिसर, हुसेनिया मस्जिद दगडी चाल, राजकोट चाल, संजोग नगर, सीआयव्ही सोसायटी, छोटी मरियम मस्जिद परिसर, दरबार कॉलनी, मुल्ला कॉलनी, बडी मस्जिद, जुना मुकुंदनगर परिसर, शिरीन बाग, बॉम्बे हॉस्पिटल परिसर, नशेमान कॉलनी परिसरातून गेलेली आहे. ही वायर सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत खाली आली असून, ती अनेक ठिकाणी सहज नागरिकांच्या हाताला लागेल इतकी खाली लोंबकळत आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात आला असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
2018 मध्ये इनाम मस्जिद परिसरात बांधकाम सुरु असताना विश्वनाथ उर्फ नितीन भालेराव या कामगाराचा वायरीला हात लागून त्याचा जीव गेला. तर काही महिन्यांपूर्वी फकीरवाडा भागात विद्युत वायरीला धक्का लागून एका बालकाचा देखील जीव गेला आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये ही वायर अजून खाली येऊन धोकादायक बनली आहे. तसेच या भागातील अनेक डिपी उघड्या असून, लहान मुले खेळत असतात व महिला व नागरिक या रस्त्यावरून नेहमी ये-जा करीत असतात. यापासून त्यांना धोका निर्माण झाला आहे. सध्या पावसाळयाचे दिवस असल्याने कधीही जोरदार पाऊस व वारा येवून लोंबकळलेली ही मुख्य विद्युत वाहक वायर जमीनीवर पडून मोठी दुर्घटना घडू शकते. याकडे मात्र संबधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.
महावितरणने या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष न करता तातडीने धोकादायक बनलेल्या लोंबकळणारी मुख्य लाईनच्या (हायटेन्शन) वायर ओढून घेऊन त्याला उंची द्यावी व उघड्या असलेल्या डिपीला बंदिस्त करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास मुकुंदनगर येथील नागरिकांसह कोणतीही पूर्वसूचना न देता, विद्युत महावितरण कार्यालयात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
विद्युत महावितरण ज्या प्रमाणे सक्तीने वीज वसुली करते, त्याप्रमाणे नागरिकांना देखील सेवा पुरविणे महावितरणचे कर्तव्य आहे. फक्त पैश्यासाठी विद्युत महावितरणने सेवा न देता, नागरिकांच्या सुरक्षिततेकडे देखील लक्ष द्यावे. मुकुंदनगर भागात काही दुर्घटना घडल्यास त्याला विद्युत महावितरण जबाबदार राहणार आहे. -साहेबान जहागीरदार (शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग)