• Fri. Sep 19th, 2025

सैनिक बँकेच्या गलथान कारभारामुळे लिपिकाचा बळी -विनायक गोस्वामी

ByMirror

Aug 13, 2024

चोराला सोडून संन्याशाला शिक्षा दिल्याचा आरोप; साळवे कुटुंबाला आधार देण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कर्जत शाखेत 1 कोटी 79 लाख रुपयांच्या अपहार प्रकरणी हंगा येथील लिपीक बाबासाहेब धनु साळवे यांना विनाकारण जबाबदार धरत या प्रकरणात अडकवल्याने त्यांना निलंबित व्हावे लागले होते.

बाबासाहेब धनु साळवे

परिणामी ते निलंबित झाल्याने त्यांना मानसिक धक्का बसला, त्यातून त्यांचा अपघात झाला आणि त्या अपघातामुळे तब्बल वर्षाने त्यांचा रविवारी (दि.11 ऑगस्ट) रोजी मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूला सैनिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जबाबदार असून, चोराला सोडून संन्याशाला शिक्षा दिल्याचा आरोप सभासद विनायक गोस्वामी यांनी केला आहे.


बाबासाहेब साळवे यांना सहकार विभागाने व पोलिसांनी क्लीन चीट दिली असतानाही कोरडे यांनी संचालक मंडळाला चुकीची माहिती सांगून त्याला निलंबित करायला भाग पाडले. चेअरमन व काही संचालकांनी सत्तेच्या बळावर साळवे यांचा त्या अपहार प्रकरणाशी काडीचाही संबंध नसताना निलंबित केले होते. विनाकारण अडकविल्याने व निलंबित केल्याने मानसिक आघात होऊन साळवे यांचा अपघात झाला. सैनिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चुकीची माहिती पुरवल्याने बेजबाबदार संचालकामुळेच साळवेचां बळी गेला असल्याचे गोस्वामी यांनी म्हंटले आहे.


कर्मचाऱ्यांची पिळवणूक करणाऱ्या जबाबदार सैनिक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तत्कालीन चेअरमन व काही जबाबदार संचालक यांच्याविरुद्ध कायदेशीर दाद मागितली जाणार आहे. त्यांना शासन व्हावे म्हणून, आमचा प्रयत्न राहणार आहे. बँकेच्या कर्मचारीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध व त्यांचा हक्कासाठी संविधानिक लढा सुरू करत असल्याचे गोस्वामी यांनी स्पष्ट केले आहे.
दोषी नसतानाही बाबासाहेब साळवे यांना मोठी शिक्षा भोगावी लागली, यामध्ये त्यांचा जीव गेला. बँकेच्या संचालक मंडळाने त्याच्या मुलाला त्वरित अनुकंपा तत्वावर कामावर घ्यावे, उघड्यावर आलेल्या साळवे कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, त्यांचे सर्व देणे बँकेने त्वरित द्यावे, त्याचे संपूर्ण कर्ज माफ करण्याची मागणी करण्यात आली आहे.


सैनिक बँकेतील मुख्यकार्यकारी आधिकारी व चेअरमन अनेक कर्मचाऱ्याची पिळवणूक करत होते व करत आहेत. त्यात बाबासाहेब साळवे यांचा बळी गेला. त्यांच्या त्रासामुळे अनेकांना नोकरी सोडावी लागली. कोरडे यांच्या विरोधात अनेकांनी सहकार विभागाकडे व पोलीस स्टेशनला तक्रारी केल्या, मात्र त्यांच्या बेजबाबदारपणाला चाप बसलेला नाही. आता तरी त्यांना पाठीशी घालणाऱ्यांनी त्यांच्या मनमर्जीला रोखावे, अन्यथा बँकेला मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. -विनायक गोस्वामी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *